दक्षिण कोकणात पर्यटन बहरले

दिवाळीच्या सलग सुट्ट्यामुंळे पर्यटकांची मांदियाळी
रत्नागिरी, सिंधुदुर्गला अधिक पसंती; समुद्रकिनारे पुन्हा गजबजले

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेली टाळेबंदी राज्यशासनातर्फे शिथिल करत, पर्यटनाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे दक्षिण कोकणातील पर्यटन पुन्हा एकदा बहरले आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पर्यटकांची अधिक पसंती असून, या पर्यटन स्थळांमध्ये दिवाळीच्या सलग सुट्ट्यामुंळे पर्यटकांची मांदियाळी जमल्याचे चित्र आहे.
सलग सुट्टयांमुळे पर्यटकांनी दिवाळीच्या दुसर्‍या दिवसापासूनच मोठया संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटकांनी दक्षिण कोकणाला अधिक पसंती दर्शवत, दापोली, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्‍वर, गणपतीपुळे आदी समुद्रकिनार्‍यावर गर्दी केली आहे. गेली दीड वर्ष कोरोनाकाळात सर्वच बंद असल्यामुळे कंटाळलेला पर्यटक अतिउत्साहाने कोकणातच फिरायला येण्यासाठी बाहेर पडला आहे.
विरंगुळा किंवा विसाव्यासाठी कोकणाकडे वळलेला पर्यटक समुद्रामध्ये जलक्रीडेचा आनंद लुटणे, वाळूतील खेळ, उपलब्ध वॉटरस्पोर्टचा आनंद घेणे यामध्ये मग्न होऊन गेले आहेत. याशिवाय, निसर्गपर्यटन, ऐतिहासिक स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव, कोकणातील खास पाककृतींचा आस्वाद यामध्ये पर्यटक पूर्णतः रममाण झाल्याचे चित्र आहे.
यंदाची दिवाळी सणाची सुट्टी 1 नोव्हेंबर पासूनच सुरू झाली असून, बहुतांशी महाविद्यालयांना 14 तारखेपर्यंत सुट्टी आहे. तर माध्यमिक व प्राथमिक शाळांना 28 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी आहे. त्यामुळे किमान 13 तारखेपर्यंत सर्वच रिसॉर्ट फुल्ल आहेत. तसेच मुलांना देखील शालेय सुट्टी असल्याने सलग 15 दिवस पर्यटकांना यंदा मज्जा करायला मिळाली आहे.
यामुळे पर्यटकांनी दिवाळीची आंघोळ आटपून दिवाळीच्या दुसर्‍या दिवशीच्या मुहूर्तावर सर्वच पर्यटन स्थळावर गर्दी केली आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्राबरोबरच इतरही राज्यातून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्यापासूनच आगाऊ नोंदणी केल्यामुळे बहुतेकांकडील पर्यटकांची सुविधा हि बर्‍यापैकी फुल्ल झाली आहे. येणार्‍या पर्यटकांच्या गाड्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत होते. कारण 80% पर्यटक बहुसंख्येने चारचाकी गाडया तसेच मोठ्या ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत. तर बहुतांशी तरुण मंडळींनी दुचाकीला पसंती दिली आहे.

Exit mobile version