ऐतिहासिक कर्नाळ्याचे पर्यटकांना आकर्षण

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेलपासून जवळ असणार्‍या कर्नाळा पक्षी अभयारण्य, तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर गिर्यारोहण करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन वर्षांमध्ये तब्बल 1,90,491 पर्यटकांनी येथे भेट दिली असून यातून 93,36,660 इतके प्रवेश शुल्क मिळाल्याची माहिती अभयारण्य प्रशासनाने दिली आहे.

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील वातावरण नेहमीच थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतद्वाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यांसारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक, तर 38 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आहेत. त्यामुळे पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने कर्नाळा अभयारण्यात येतात. मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्‍या या पर्यटन क्षेत्रामध्ये कोकणात जाणारे अनेक जण थांबतात. त्याचबरोबर कर्नाळ्याला ऐतिहासिक वारसा असल्याने गिर्यारोहकांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साहजिकच कर्नाळा परिसरामध्ये पक्षीप्रेमी गिर्यारोहकांचे प्रमाण वाढले आहे.

वनभोजनाची उत्तम व्यवस्था
कर्नाळा हे घनदाट जंगल आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडे आहेत. सिमेंटच्या जंगलामधून काही काळ हिरव्यागार वनराईमध्ये घालवण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातून अनेक जण कर्नाळा अभयारण्यात येतात. या ठिकाणी वनभोजनाची व्यवस्था स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

किल्ला गिर्यारोहकांसाठी बंद
कर्नाळा किल्ला ऐतिहासिक असल्याने अनेक पर्यटक, इतिहास अभ्यास, संशोधक तसेच गिर्यारोहक येतात. मात्र किल्ल्याचा परिसर धोकादायक झाल्याने या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून येणार्‍या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

Exit mobile version