| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या हंगामाने आता जोर पकडला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समुद्र किनारे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, पाली, महड येथील अष्टविनायक क्षेत्रांसह ऐतिहासिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रविवारी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजून गेली होती. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्यात पर्यटन हंगामाला चांगलीच ओहोटी लागली होती. सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या नवीन पर्यटन हंगामावर पावसामुळे पाणी पडले होते. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा गजबजू लागली आहेत. तर प्रमुख मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, किहीम, मांडवा, आक्षी-नागाव, मुरुड, काशिद, श्रीवर्धनमधील समुद्र किनारे येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे किनाऱ्यांवर साहसी खेळांसह विविध प्रकारच्या व्यवसायांना पुन्हा तेजी मिळाली आहे. याचबरोबर थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान येथेही पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे. जिल्ह्यातील महड आणि पाली या अष्टविनायकाच्या क्षेत्रासह इतर धार्मिक स्थळांवर पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. याशिवाय किल्ले रायगड, मुरुडमधील जंजिरा किल्ल्यासह इतर ऐतिहासिक वास्तु पाहण्यासाठी पर्यटक आलेले पहायला मिळत आहे. दरम्यान, आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवास नेहमीच अडथळ्याचा असतो. घरी परतणाऱ्या पर्यटकांची बस स्थानक, जलवाहतूक सेवा, खाजगी वाहन स्थळांवर गर्दी झालेली पहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजली
