ठाण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश

। माणगाव । सलीम शेख ।
मुंबई येथून मोटरसायकलवरून 17 तरुण पर्यटक पर्यटनासाठी माणगाव तालुक्यात आले होते. भिरा येथील देवकुंड पाहून झाल्यानंतर परत माघारी फिरल्यानंतर रस्त्यात असणार्‍या माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात ते पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी तीघे पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एका तरुणाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. तर उर्वरित दोघेही बुडत असताना त्यांना बाहेर काढण्यात मित्रांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

3 जुलै रोजी रविवारी सकाळी मुंबई येथून 17 तरुण पर्यटक आपल्या मोटरसायकलवरून माणगाव तालुक्यातील भिरा भागातील देवकुंड व परिसरात पर्यटनासाठी आले होते. देवकुंड पाहिल्यानंतर ते सर्वजण परत फिरले. त्यानंतर ते म्हसेवाडी हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात पोहण्यासाठी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास गेले. त्यात दिनेश तुकाराम शिंदे (वय 24,रा. पिंपरीगाव, दहिसर, ठाणे) याचा पाण्याचा प्रवाहात बुडून मृत्यू झाला. तर त्याचे साथीदार संदीप ताबेकर व हर्षद मेंदे या दोघांना पाण्यात बुडताना वाचविण्यात साथीदारांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version