धार्मिक स्थळे ही गजबजली
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
जैवविविधतेने नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्रकिनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. अवेळी पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे, तसेच शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्ट्यांबरोबर दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. चार ते पाच दिवसांनी पर्यटकांची पावले या मार्गाला लागतील.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतात. यंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंतदेखील पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र, सध्या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली राज्य महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर महामार्ग आदी मार्गांवर गर्दी होत आहे. तर, काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील पाहायला मिळत आहे. हॉटेलदेखील आगाऊ बुक करण्यात आलेले आहेत.
येथे गर्दी
जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरानलादेखील पर्यटक आता गर्दी करत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत. राज्याभिषेक दिनीदेखील रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. मुरुड आणि अलिबाग समुद्रकिनाऱ्याची मजा लुटतानाच पर्यटक येथे असलेल्या कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. कारण, एकाच ठिकाणी समुद्रकिनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो.
समुद्रकिनारे फुल्ल
अलिबाग-नागाव, वरसोली, मुरुड-काशिद, श्रीवर्धन-दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. घोडागाडी, एटीव्ही राईड्स, घोडा व उंट सफारी पर्यटक याचा आनंद घेत आहेत.
रिसॉर्ट व फार्महाऊस
शहरातील मंडळींना ग्रामीण भागात असलेले रिसॉर्ट, फार्महाऊस व ॲग्रो टुरिझमचे आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरण, शुद्ध हवेचा व सात्विक खाण्याचा ते आनंद घेतात. शिवाय, काही काळ मोबाईल नेटवर्कपासून दूर गेल्याने रिफ्रेश होतात. स्विमिंगपूल असलेल्या रिसॉर्ट व फार्महाऊसला अधिक मागणी आहे. येथे मित्रमंडळी, बच्चेकंपनी, महिला मस्त डुंबण्याचा आनंद घेतात. याबरोबरच चुलीवरचे जेवण, टेंट, कॅम्पेन आणि निसर्ग सफर ट्रेकिंग आणि स्विमिंगपूलमध्ये डुंबण्याचा आनंद पर्यटक घेतात.
पावसामुळे मे महिन्यामध्ये बरेच दिवस पर्यटकांनी पाठ फिरवली होती. मात्र, आता उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सरत आहे. त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होत आहे. पर्यटक समुद्र किनारी राहणे व मज्जा करणे पसंत करतात. त्यामुळे समुद्रकिनारे फुल्ल आहेत. अनेकांनी आगाऊ बुकिंग केली आहे. राहण्याखाण्याच्या किमतीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत थोडीच वाढ झाली आहे.
सिद्धेश कोसबे,
सरपंच व व्यावसायिक, दिवेआगर
कुटुंब व मित्रपरिवारासमवेत कोकणात रायगड जिल्ह्यामध्ये फिरायला आलो आहे. येथील दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धन तसेच अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली व महाड येथे भेट दिली.
धनंजय धुमाळ,
पेझारी






