पर्यटकांची माथेरान घाटात कोंडी

| नेरळ | वार्ताहर |

माथेरान वाहन तळ येथील पार्कींगचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरम्यान वाहन पार्किंग फुल झाल्याने विकेंडला माथेरान घाटात पार्किंगपासून अडीच किलोमीटर रांगा वाहनांच्या लागल्या होत्या. यामुळे काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबून पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर काही तासात ही वाहतूक कोंडी सोडवून पर्यटकांना दिलासा दिला.

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. दरम्यान शनिवार रविवार विकेंडला माथेरानला येणार्‍या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. छोटे हिल स्टेशन म्हणून आणि मुंबई पुणे या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणून सर्वाधिक पसंती पर्यटक माथेरानला देतात, परंतु माथेरान फिरण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना गेली कित्येक वर्षे वाहन पार्कींगच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. येथील अपुरी वाहन पार्किंग व्यवस्था येणार्‍या पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आज 26 मे रविवार विकेंड असल्याने पर्यटकांचा लोंढा माथेरान दिशेने वळला होता. बारावीचे निकाल जाहीर झाले असून दहावीच्या निकाल उद्या सोमवार 27 मे रोजी हाती होणार असल्याने देखील ही गर्दी वाढली असल्याचे बोलले जात होते. आज माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा नियोजन अभावी लवकरच फुल झाल्याने येणार्‍या पर्यटकांची वाहने नेहमीप्रमाणे दस्तुरी वाहन तळ येथून ते गारबट जाणार्‍या रस्त्यावर म्हणजेच साधारण अडीच किलोमीटर रांगा वाहनांच्या घाटात दिसत होत्या. घाटात झालेली वाहनांची ही गर्दी दोन्ही दिशेने जाणार्‍या वाहनांना अडचण ठरत होती. त्यामुळे तासंतास पर्यटकांना आपल्या वाहनात अडकून पडावे लागले. काही पर्यटकांनी वाहनातून उतरून माथेरान गाठले तर काही तासानंतर वाहतूक कोंडी सुटल्यानंतर माथेरान दस्तुरी नाका येथे पोहचले होते. यावेळी नेरळ पोलीस व माथेरान पोलीस यांनी आपली कामगिरी चोख बजावली. आज बाहेरील पोलीस अधिकारी कदम हेदेखील माथेरान फिरण्यासाठी म्हणून आल्याने त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागला.

नेरळ माथेरान नेरळ सेवा देणारे चालक यांना देखील ह्या वाहम गर्दीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळाची जागा वाढवण्याचे प्रशासनाने नियोजन केले गेले पाहिजे म्हणून पुन्हा एकदा मागणी पुढे आली आहे. अपुर्‍या जागे अभावी वाहन पार्किंग सेवा फुल होते आणि याचा फटका येणार्‍या पर्यटकांवर होत आहे. बहुतेक पर्यटक हे खाजगी वाहनाने माथेरान फिरण्यासाठी पसंत करतात. एक दिवसाची सुट्टी माथेरान येथे घालवून पुन्हा घरी जाण्यासाठी म्हणून पर्यटक माथेरान हे थंड हवेचे जवळचे ठिकाण म्हणून पसंती देत असून पर्यटकांना जर अशा अडचणी होत असतील तर माथेरानला पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे कमी होईल, असेही येथील वाहन चालक व पर्यटक सांगत आहेत. आज वाहन कोंडी सोडवण्यासाठी सकाळपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना माथेरान घाटात अडकून पडावे लागले होते.

एकूणच आज माथेरान घाट तर नेरळ परीसरात देखील पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. विकेंड असताना देखील कर्जत कल्याण राज्यमार्गावर आज नेरळ या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण होत होते. त्यामुळे एकेरी वाहतूक झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभारामुळे देखील आज माथेरान पर्यटन स्थळी जाणार्‍या पर्यटकांना यामुळे ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागला. नेरळ माथेरान हुतात्मा प्रवेशद्वार येथेच तिन्ही मार्गावर वाहनांची गर्दी होती. कर्जत बाजूकडे दीड किलोमीटर तर नेरळ शहर बाजूकडे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

त्यामुळे येणार्‍या मान्सून पर्यटन हंगाम लक्षात घेता प्रशासनाने वाहन पार्किंगचा प्रश्‍न सोडवावा म्हणून आता पुन्हा एकदा मागणी पुढे येत आहे.

Exit mobile version