माथेरानच्या वाहतूक कोंडीने पर्यटक संतप्त

वाढीव भूखंडाच्या मागणीला केराची टोपली

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये सध्या दिवाळी सुट्टी साजरी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. दस्तुरी येथील वाहनतळ गाड्यांनी फुल्ल झाले आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूखंडाची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र सरकारने या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

थंडी अनुभवण्यासाठी हिवाळ्यात हजारो पर्यटक माथेरानमध्ये येत असतात.सध्या माथेरान फुल्ल झाले आहे. विशेष म्हणजे गुजरात राज्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. पर्यटकांची खासगी वाहने उभी करण्यासाठी माथेरान वन विभागाच्या जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांची वाहने उभी करून ठेवण्याची अतिरिक्त आणि कायमस्वरूपी अशी कोणतीही व्यवस्था माथेरान नगरपरिषद आणि पोलिस यंत्रणेकडेे नाही. त्यात माथेरान दस्तुरी येथील चांगभले पॉईंटपर्यंत माथेरान पोलिस ठाणे यांची हद्द असून संपूर्ण घाट हा नेरळ पोलिसांच्या अखत्यारीत येतो. त्याचा परिणाम घाटातील वाहतूक कोंडी सोडविताना हद्दीवरून अडचणी निर्माण होत असतात. दुसरीकडे दस्तूरी येथील वाहनतळ फुल्ल झाल्यानंतर नेरळ येथून घाटातून माथेरानकडे येणाऱ्या वाहनांना त्याची कोणतीही पूर्व कल्पना देण्याची व्यवस्था प्रशासनाकडे नाही. प्रशासनाने अशावेळी खासगी वाहनांची पार्किंगची व्यवस्था अन्य ठिकाणी केल्यास प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

मागील चार वर्षापूर्वी दस्तूरी येथील वाहनतळ सिमेंट काँक्रिटने बनवून घेतल्याने सध्या पूर्वीपेक्षा दुप्पट गाड्या पार्क केल्या जात आहेत. किमान एक हजार गाड्या पार्किंग करता येतील अशी व्यवस्था शासनाने माथेरानमध्ये करण्याची गरज आहे. वाहनतळाच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा भूखंड आहे. त्याची मागणी माथेरान नगरपरिषदकडून करण्यात आली आहे. मात्र गेल्या 15 वर्षात हा भूखंड शासनाने आजपर्यंत पालिकेला दिलेला नाही. त्यामुळे वाहनतळाचे विस्तारीकरण रखडले आहे.

माऊंट बेरी येथे वाहनतळ विकसित करावे
पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ आहे, मात्र प्रवासी टॅक्सी संघटनेसाठी
 कुठेही वाहनतळ नाही. शासनाने दस्तुरी येथील माऊंट बेरी भागात प्रवासी टॅक्सीचे वाहनतळ उभारावे. त्याचवेळी पर्यटन हंगामाच्या काळात वाहनतळ फुल्ल झाल्यानंतर येणारी खासगी वाहने यांच्यासाठी जूम्मापट्टी येथे वाहनतळ विकसित केल्यास घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघू शकेल. जूम्मापट्टी येथे वन जमिनीवर खासगी वाहनांसाठी वाहनतळ विकसित केल्यास सोयीचे होणार आहे. शासनाने वाहनतळ उभारुन त्याची देखभाल दुरुस्ती तसेच कर संकलन वन विभागाने केल्यास मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होऊ शकते.
वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे नुकसान
नेरळ माथेरान घाट हा देशातील अवघड वळणे असलेला घाट समजला जातो. त्यामुळे चढाव पार करीत असलेली वाहने वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास थांबून राहतात. त्यावेळी पुन्हा पिकअप घेताना वाहने गरम होतात आणि त्यामुळे वाहनांच्या  क्लच प्लेटचे नुकसान होत असते. मागील पाच दिवसात आमच्या 42 गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत, अशी माहिती नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांनी दिली.
पर्यटकांची पायपीट
घाट रस्त्यात गेली पाच दिवस दररोज वाहतूक कोंडी होत आहे. प्रवासी टॅक्सीमधून माथेरानमध्ये येत असलेल्या पर्यटकांना नाईलाजाने घाट रस्त्यात खाली उतरावे लागत आहे. दोन किंवा तीन वळणांचा चढाव चढून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. महिला पर्यटक आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास होत आहे. प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक करीत आहेत.
Exit mobile version