स्थानिकांना पावसाळी रोजगाराची संधी
। तळा । वार्ताहर ।
पावसाच्या दमदार आगमनानंतर तळा तालुक्यातील विहीरी, नद्या, धरणे, तलाव तुडूंब भरले असून पर्यटकांना वावे येथील फेसाळ पाण्याच्या धबधब्याची ओढ लागली आहे. तळा तालुका डोंगराळ निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथील पावसाळी धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. तसेच, स्थानिकांना रोजगारची संधी ही उपलब्ध होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर पासून पश्चिमेला तळा शहराकडे येताना 12 की.मी. अंतरावर वावे धबधबा लागतो. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच मुसळधार कोसळत असून तळा तालुक्याला झोडपले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदया, तलावं, विहिरी तसेच धबधबे तुडूंब भरून वाहत असून येथील फेसाळयुक्त पाण्याचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. जोरदार पावसामुळे वावे धबधबा पांढर्याशुभ्र फेसाळयुक्त रंगात धो-धो वाहत आहे. धबधब्याच्या आजूबाजूला हिरवेगार मनमोहक निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली दृश्य पहायला मिळतात. तसेच, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्वरांचा किलबिलाट, बहरलेली वृक्षवल्ली, धबधब्यातील पाण्याचा खळखळाट या आवाजांमुळे पर्यटक देहभान हरपून आनंद लुटत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा उत्तम असल्यान दरवर्षी मुंबई, पुण्यापासून हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात.
या धबधब्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने अनेक पालक आपल्या पाल्ल्यांसह भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त भिजण्यासाठी तरुणाई या धबधब्याकडे वळली जाते. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हा धबधबा वेगाने वाहू लागला असून शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळणत आहे. या धबधब्याच्या जवळच वावे गाव असल्याने पर्यटकांना चुलीवरच्या भाकर्या, शाकाहारी, मांसाहारी जेवण ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतात. यामुळे वावे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनले असून येथील स्थनिकांना पावसाळी रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे.