| अमरावती | प्रतिनिधी |
चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. अमरावतीच्या चिखलदऱ्याहून परतताना शहापूरजवळ ही घटना घडली. अपघातानंतर बचावपथकाने सर्वांना सुखरुपणे बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. या सहा जणांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांसह जिल्हा शोध व बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठत दरीत उतरून कारमधील सहाही जणांना बाहेर काढले. नईम सलाम (32), रा. अमरावती, सलमान खान लियाकत खान (35), अमरावती, सलीम सलाम (35), रा.अमरावती, अशहर मिरान मो. रफिक (31), रा. अमरावती यांच्यासह दोन चिमुकले असे एकूण सहा जण कारने चिखलदरा येथील घाटरस्ता मार्गे अमरावतीकडे निघाले होते. हे सर्व पर्यटक चिखलदरापासून दोन किलोमीटर अंतरावरील शहापूर गावासमोर सेल्फी पॉइंटजवळ पोहोचले होते. त्यावेळी अचानक त्यांची कार थेट दरीत चारशे ते साडेचारशे फुट खोल कोसळली. ही बाब तेथे उभ्या असलेल्या दोन तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच डीडीआरएफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. खोल दरीत पडलेल्या लोकांना दोराच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






