रायगड किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी

पोलिस यंत्रणा व पुरातत्त्व विभागाचे सुरक्षारक्षक सज्ज


| महाड | वार्ताहर |

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागतासाठी रायगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. रायगडावर नववर्ष साजरे करण्यासाठी येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा व पुरातत्त्व विभागाचे सुरक्षारक्षक सज्ज झाले आहेत.

रायगडावरील सहल सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते. त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येण्यास पसंती देतात. रायगड किल्ला हे पवित्र ठिकाण असल्याने येथे शिवप्रेमी व कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या अधिक असते. गडाचे पावित्र राखूनच गडावर वावरले पाहिजे, असा शिवप्रेमींचा दंडक असल्याने नववर्ष साजरे करताना मर्यादा न पाळणाऱ्यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागते. आता पोलिसही गडावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
स्वराज्याची राजधानी असलेला रायगडावर सध्या थंडीचा हंगाम असून मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणांहून सहली दाखल होत आहेत. सध्या शाळांना नाताळची सुटी असल्याने व 31 डिसेंबर उत्साहात साजरा करण्याकरिता अनेकांची पावले किल्ल्याकडे वळली आहेत. रायगड किल्ला हे पवित्र ठिकाण असल्याने या ठिकाणी हौशी व मौजमज्जा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव केला जातो. असतो. यामुळे रायगडावर नववर्षासाठी स्वागत करण्याकरिता येणारे शिवप्रेमी आपली मर्यादा राखून नववर्ष स्वागत करतात.

तळीरामांवर लक्ष
नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच रायगड किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे, याकरिता महाड तालुका पोलिस यंत्रणा सज्ज झाले आहेत. रायगड रोप वे, चित्त दरवाजा, शिवसमाधी व राज दरबार अशा मुख्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी पोलिसांकडून तसेच पुरातत्त्व विभागाकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. रोप वे व पायी जाणाऱ्यांवर लक्ष दिले जाणार असून मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. पाचाड नाका तसेच नातेखिंड येथे वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
व्यावसायिकांची चलती
शालेय सुट्यांमुळे पर्यटकांची वाढलेली गर्दी तसेच नववर्ष स्वागतासाठी रायगडावर येणारे शिवप्रेमी व पर्यटकांमुळे सध्या रायगड किल्ला गजबजला आहे. त्यातच नववर्ष स्वागतालाही गडावर गर्दी होणार असल्याने व्यावसायिकही तयारीत आहेत. पर्यटकांनी आगाऊ आरक्षणे केली आहेत त्यामुळे रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी तसेच रायगड परिसरातील निवास व्यवस्था व हॉटेल हाऊसफुल झाले आहेत. गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. घरगुती निवास व्यवस्था, घरगुती जेवण व स्थानिक वाहतूक यांची देखील मोठी चलती आहे. काही मिनिटांतच रायगडावर जाण्याकरता रोप-वेची सुविधा असल्याने रायगड रोप-वेवरही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे दैवत असल्याने गडावर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. रायगड किल्ला व महत्त्वाच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. गडाचे पावित्र्य येथे येणाऱ्या प्रत्येकाने राखावे
आर.पी.मायने, पोलिस निरिक्षक,
महाड तालुका पोलिस ठाणेआर.पी.मायने, पोलिस निरिक्षक,
महाड तालुका पोलिस ठाणे
Exit mobile version