जिल्ह्यात पर्यटकांचे तुफान

सुट्टीत पर्यटकांची रायगडला पसंती

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
नाताळाचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध भागातून रायगड जिल्ह्यात पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. नवीन वर्षांच्या पार्श्‍वभूमीवर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांकडून रायगड जिल्ह्याला पसंती मिळत असून, पपर्यटक दाखल होण्यास सुरवात झाली आहे.
कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. अर्थचक्र कोलमडून गेले होते. कोरोना संकट काळात तब्बल दीड वर्षांपासून सर्वत्र जनजीवन अक्षरशः थांबले होते. मात्र आता आलेल्या नाताळ व विकेंड सुट्ट्या चा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. नव्याने आलेल्या ओमीक्रोनच्या संसर्गाने मागील वर्षीच्या तुलनेत जेमतेम 10 टक्के पर्यटकांची घट झाली आहे. राहण्या-खाण्याची दरे स्थिर आहेत. परिणामी व्यवसाईक व पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
(दि.24)शुक्रवार पासुनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. येथिल समुद्र किनारे, मंदिरे, एैतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे मागील 8 महिन्यांपासून मंदीच्या छायेत असलेले हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, खानावळी, दुकानदार व छोटे मोठे व्यवसाईक यांची सध्या चलती आहे. राहण्या-खाण्याच्या दरात वाढ न झाल्याने पर्यटक मात्र खुश आहेत. या पर्यटन क्षेत्रामध्ये काय चालले आहे याबाबत आम्ही माहिती घेतली.

समुद्र किनार्यांची भुरळ
जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्‍वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच किनर्यांवर बोटींग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत. अलिबाग समुद्रकिनार्याची मजा लुटतांनाच पर्यटक येथे असलेल्या कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत.

रायगडावर शिवप्रेमींचा जलसा
अनलॉक नंतर आता रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठया संख्येने येत आहेत. अनेकजण गडावर जाण्यासाठी अनेकजण रोपवेला पसंती देत आहेत. त्यामुळे तेथे गर्दी होतांना दिसत आहे. येथील छोटे मोठे व्यवसाईक खुश आहेत.

तब्बल 8 महिन्यांनंतर मंदिर उघडले आहे. त्यामुळे भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. येणार्या भाविकांचे टेम्प्रेचर तपासले जाते. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी व उपयोजना केली आहे. तसेच अन्नछत्र व भक्तनिवास देखील खुले केलेले आहेत.
अ‍ॅड. धंनजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्‍वर देवस्थान, पाली

शिवप्रेमी व पर्यटक रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे येथील व्यवसाईकांचा व्यवसाय तेजीत आला आहे.
अजित औकिरकर- व्यवसाईक व माजी उपसरपंच, हिरकणीवाडी

Exit mobile version