। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुका हे पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप मुरुड समुद्रकिनारी वळतात. त्यात सलग आलेल्या सुट्ट्या आणि यात्रा उत्सव असल्याने विविध जिल्ह्यांतून पर्यटकांनी शेकडोंच्या संख्येने मुरुड समुद्रकिनारी व ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. रविवारी सकाळपासून मुरूडचा पारा 40 सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढलेल्या तापमानामुळे पर्यटकांनी स्वच्छ निळ्याशार आणि सुंदर समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तर, कोणी बनाना राईड, घोडागाडी, बाईकवर सवारी केली. त्याचवेळी किनार्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंदही पर्यटकांनी लुटला. त्यामुळे स्थानिक हॉटेल, टपरीधारक व लॉजीग फुल झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने मुरूड शहराला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.