समुद्र किनार्यांना पर्यटकांची पसंती, राहण्या खाण्याच्या किंमती वाढल्या
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यातील विस्तीर्ण 240 किमीचा समुद्र किनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे व निसर्ग सौंदर्य यामुळे जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. ही पर्यटनस्थळे कायम गजबजलेली दिसतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये येथील पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली आहेत. मात्र उष्मा वाढल्याने समुद्र किनार्यांना पर्यटकांची अधिक पसंती आहे. एसी रुमना अधिक जास्त मागणी आहे. राहण्या खाण्याच्या किंमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे.
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणुन सर्वत्र परिचित आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यात गारवा घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पहायला मिळत आहे. आठवड्या भरापासुनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणार्या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे सकाळी व सायंकाळी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. उष्णता अधिक असल्याने रायगड किल्ल्यावर पर्यटक कमी प्रमाणात येत आहेत. समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरण जवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महिनाभरात येथील नगरपालिका, नगरपरिषदा, व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

किनार्यावर राईड्सची मज्जा
अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. किनार्यांवर बोटींग, घोडागाडी, बनाना, बाईक राईडची व पॅरा ग्लायडिंगची मजा पर्यटक लुटत आहेत. यांचे दर देखील वाढले आहेत.
सुट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. दर्शनाबरोबर पर्यटक समुद्रकिनारी विविध राईड्सची मजा लुटतात. व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला होत आहे. शिवाय महसूल देखील वाढत आहे. गर्मी अधिक असल्याने यंदा एसी रुमना अधिक मागणी आहे. विजेचे दर वाढल्याने एसी रुमचे भाडे देखील वाढले आहे. – अमित खोत, सरपंच, हरिहरेश्वर
उन्हाची काहिली वाढली असल्याने रायगड किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांची फारशी गर्दी नाही. त्यामुळे रोपवेची सायंकाळची वेळ वाढविण्यात यावी जेणेकरून ऊन कमी झाल्यावर दुर्गप्रेमी किल्ल्यावर येऊ-जाऊ शकतील. अनेक लोक समुद्र किनार्यांना पसंती देत आहेत. . – अजित औकिरकर, व्यावसायिक, रायगड किल्ला
उष्मा वाढल्याने सकाळी व सायंकाळी भाविकांची गर्दी अधिक असते. भाविकांची संख्या वाढत आहे. आर्थिक उलाढाल चांगली होत आहे. – राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देऊळ






