स्वच्छता गृह सुरू करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या सोयीसाठी प्रेक्षणीय स्थळी पर्यटक बहुसंख्यने जात असतात आणि त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छता गृह बांधले आहेत. मात्र, शहरातील महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळी उभारण्यात आलेले स्वच्छता गृह बंद अवस्थेत आहेत. ते स्वच्छता गृह तात्काळ सुरू करण्यात यावेत अशी मागणी अश्वपालक यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
माथेरान सुप्रसिद्ध एको पॉईंट या ठिकाणी अनेक पर्यटक फिरायला येतात. याच ठिकाणी नगर परिषदेने नव्याने बांधलेले बाथरूम चालू करावे जेणेकरून महिलांना आणि पर्यटकांना होणारा त्रास आपण लक्षात घेतला पाहिजे. बाथरूमची योग्य ते सुविधा नसल्यामुळे पर्यटक आजूबाजूच्या जंगलाचा वापर करतात आणि जंगल सुद्धा खराब होत आहे. माथेरान पालिका पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छता कर वसूल करीत असते. मात्र, त्याबदल्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवित नाही. त्यात एको पॉईंट येथे पर्यटकांची दररोज होणारी गर्दी लक्षात घेता माथेरान नगरपरिषद कडून बसवण्यात आलेले स्वच्छता गृह तत्काळ खुले करण्यात यावे अशी मागणी स्थानिक अश्वपालक यांनी केले आहे.
माथेरान पालिकेने त्या ठिकाणी मे महिन्यात स्वच्छता गृह उभे केले आहे. पण ते स्वच्छता गृह पालिकेने खुले केले नाही आणि त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल तेथील रहिवाशी रेखा पाटील यांनी पालिकेकडे लेखी अर्ज करून मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीवर देखील माथेरान पालिकेने दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर आता अश्वपालक राकेश कोकळे तसेच अन्य अश्वपालक यांनी पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना लेखी निवेदन देऊन एको पॉईंट वरील स्वच्छता गृह तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे.







