मुरूड जंजिर्‍यावर पर्यटकांची जत्रा

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

सलग जोडून आलेली तीन दिवसांची सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने राज्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्रकिनारे आणि जलदुर्ग पाहण्यासाठी वळली असून, हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याचे ठिकठिकाणी माहिती घेताना कळत आहे. मुरूडचा ऐतिहासिक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांच्या तुडुंब हजेरीने भरून गेल्याचे शनिवारी दिसून आले. राजपुरी जेट्टी आणि खोरा बंदर जेट्टीवर जंजिर्‍यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी शनिवारी सकाळपासून दिसत होती. पद्मजलदुर्ग पाहण्यासाठीदेखील मुरूड किनार्‍यावरून यांत्रिक बोट सेवा सुरू आहे.


मुरूड तालुक्यातील काशीद, नांदगाव, मुरूड आदी समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी हजेरी लावली असून, जत्रेचे स्वरूप आले आहे. काशीद समुद्रकिनारा शुक्रवारपासून पर्यटकांनी फुलून गेल्याची माहिती काशीद गावचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी शनिवारी दुपारी बोलताना दिली. दुरुस्तीसाठी साळाव ते रेवदंडा पूल बंद असूनही पर्यटकांनी रोहा-चणेरा, खारी, मिठेखारमार्गे काशीद, नांदगाव, मुरूड गाठले आहे. हा मार्ग 35 कि.मी. लांब अंतराचा असूनही सुमारे दीड हजार वाहने येथे आल्याची माहिती जंगम यांनी दिली.

मुरूडमध्ये देखील सुमारे 500 वाहनांतून आल्याची माहिती नगरपरिषद मुख्य टोल नाक्यावर देण्यात आली. मुरूड समुद्रकिनार्‍यावर चारचाकी वाहनांना मोफत पार्किंग उपलब्ध असल्याने अनेक वाहने ठिकठिकाणी पार्क करण्यात आली आहेत. जंजिरा किल्ल्याकडे मुरूड मासळी मार्केटवरून एकदरा पुलाकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने येथे वाहनांची सतत कोंडी होत आहे. यावर कोणतीही प्रभावी उपाययोजना शासनाने केलेली अद्यापही दिसून येत नाही. हजारोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा, पद्मजलदुर्ग, समुद्रकिनारे पाहण्यासाठी रोहा, केळघर, साळाव, भालगावमार्गे दाखल झाले आहेत. समुद्रकिनारी उपलब्ध क्रीडा, मनोरंजन सुविधांचा लाभ पर्यटक घेताना दिसून येत आहेत. मुरूडचे दत्त देवस्थान, नांदगाव येथील सिद्धीविनायक देवस्थान पाहण्यासाठी पर्यटकांनी भेट देऊन दर्शन घेतले. पर्यटन हंगाम सुरू झाल्याने स्टॉलधारक, लॉजिंग, हॉटेलिंग व्यवसाला तेजी येणार आहे. मुरूड शहरासाठी शासनाकडून आलेल्या निधीतून सौंदर्यकरणाची विकासकामे सुरू असून, लवकरच पर्यटकांना मुरुडचा नवीन लूक पाहायला मिळेल.

Exit mobile version