अलिबाग पोलीसांचे दुर्लक्ष; नियमांचे उल्लंघन करीत वाहने समुद्रालगत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ आहे. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचा फटका स्थानिकांना बसत आहे. नागाव समुद्रकिनारी काही पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करीत समुद्रालगत वाहने उभी केली. त्यामुळे समुद्रकिनारी फिरणार्या पर्यटकांसह स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला . परंतु, अलिबाग पोलीस ठाण्याकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अलिबाग, नागाव, आक्षी पर्यटकांच्या पसंतीला उतरणारे समुद्रकिनारे आहेत. सुट्टीच्या दिवशी या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांनी हे किनारे फुलून जातात. समुद्रकिनार्यावर पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या किनार्यावर चारचाकी वाहनांना अलिबाग पोलिसांनी बंदी घातली आहे. रविवारी सुट्टीचा आनंद पर्यटक समुद्रकिनारी लुटत होते. दरम्यान काही पर्यटकांनी त्यांची चारचाकी वाहने किनार्यावर उभी केली होती. त्या ठिकाणी पर्यटक मौजमजा करीत होते. मात्र किनार्यावर नियमांचे उल्लंघन करीत वाहने उभी करणार्यांवर अलिबाग पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले. किनार्यावर पर्यटक असताना त्याठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यास अलिबाग पोलीस अपयशी ठरले आहे. पर्यटकांच्या या अतिउत्साहीपणामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे बोलले जात आहे. अलिबाग पोलीस निरीक्षक बागूल याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.