| पाली | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात कुटुंबासह आलेले पर्यटक येथील सुक्या मासळीच्या खरेदीला पसंती देत आहेत. सुकी मासळी बारमाही उपलब्ध असते. पर्यटक बंदरात वाळत ठेवलेल्या वाकट्या, बोंबील, कोळंबीचे सोडे, सुकट यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सुकी मासळी अनेक दिवस टिकत असल्याने जास्तीत जास्त दिवस पुरेल इतका साठा करण्यासाठी जणू काही जणांमध्ये स्पर्धा लागते. नाताळनिमित्त आलेल्या पर्यटकांकडून साधारण चार ते पाच कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज विक्रेत्यांकडून वर्तवण्यात आला आहे.
हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात इतर कोणतीही फळे तयार झालेली नसतात. त्यामुळे परतीच्या प्रवासात काय नेणार अशा विवंचनेत असलेले पर्यटक विशेषतः महिला सुकी मासळी खरेदी करण्यात सर दाखवतात. वरसोली, नागाव, काशीद, मुरूड आणि श्रीवर्धन समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांमुळे यंदा उलाढाल कोट्यवधींत गेली आहे. सुकी मासळी किनार्यावरील कोणत्याही गावात सहज उपलब्ध होणारी आहे. इतर ठिकाणांपेक्षा येथे चांगल्या दर्जाची आणि माफक किमतीत सुकी मासळी मिळते.
सुक्या मासळीला वाढती मागणी लक्षात घेऊन, काही महिला विक्रेत्यांनी प्रमुख मार्गावरच दुकाने थाटली आहेत. वरसोली, किहीम समुद्रकिनारी तर सुकी मासळी टोपलीत घेऊन विकणार्या महिला सर्वत्र दिसतात. दरात थोडीफार घासाघीस केल्यास माफक दरात चांगली मासळी मिळते. एका ग्राहकाने खरेदी केल्यावर त्याच्यासोबतचे इतरही खरेदी करतात, त्यामुळे बघता बघता काही हजारांचा माल काही मिनिटात संपत असल्याचे विक्रेते सांगतात.