थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची फार्म हाऊसेसना पसंती

ग्रामीण अर्थचक्र होते गतिमान

| सुधागड -पाली | वार्ताहर |

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गजबजलेल्या हॉटेल्समध्ये न जाता मदिरेचा मनमुराद आस्वाद घेण्याबरोबरच मदिराक्षींचा सहवास लुटण्यासाठी पर्यटक रायगडातील ग्रामीण भागातील फार्महाऊसेसना सर्वाधिक पसंती देत असल्याचे जाणवू लागले आहे. यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात अर्थचक्र गतिमान होताना दिसत आहे. यंदाच्य थर्टीफर्स्टसाठी सर्वाधिक बुकींग हे फार्महाऊसेसच झाल्याचे बोलले जाते.

मुंबई-पुणे आदि शहरातील उच्च व मध्यमवर्ग यांचे तसेच स्थानिकांचे कर्जत, अलिबाग, सुधागड, खालापूर, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, महाड अशा तालुक्यातील समुद्र किनारी व नैसर्गिक पर्यावरणात ग्रामीण भागात फार्म हाऊस आहेत. एरवी बंद असलेली ही फार्महाऊस डिसेंबरच्या दोन-तीन दिवस आधी उघडतात. सध्या तिथे गजबज दिसू लागली आहे. फार्महाउस मालक आपले कुटुंब, आप्तेष्ट व मित्रांसोबत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शहरातील गर्दी कोलाहल आणि प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त मजा लुटण्यासाठी फार्म हाऊसपेक्षा दुसरी चांगली जागा नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

शहरातील मंडळींना ग्रामीण भागात असलेले फार्महाऊस व ऍग्रो टुरिझमचे आकर्षण आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी त्यांची येथे पसंती असते. निसर्गरम्य वातावरण, शुद्ध हवेचा व सात्विक खाण्याचा ते आनंद घेतात. शिवाय काही काळ मोबाईल नेटवर्कपासून दूर गेल्याने रिफ्रेश होतात.

जितेंद्र गद्रे
गद्रेज नंदनवन अ‍ॅग्रोे टुरिझम संचालक

फार्महाऊसेसची वैशिष्टे:-
1) पोपटी व चुलीवरचे जेवण
फार्महाऊसवर प्रामुख्याने चुलीवर शिजवलेल्या जेवणाला अधिक पसंती आहे. त्यामध्ये चुलीवरचे मटण किंवा चिकनला अधिक पसंती. काही ठिकाणी बार्बेक्यूची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जिल्ह्यातील प्रसिद्ध पोपटीचा बेत हमखास केला जातो.

2) कॅम्पेन आणि निसर्ग सफर
ज्यांना रूममध्ये राहायचे नसेल त्यांच्यासाठी खास तंबू टाकून कॅम्पेनची व्यवस्था केली जाते. याबरोबरच आजूबाजूचे निसर्ग, डोंगर, किल्ले या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव देखील दिला जातो. बहुतांश ठिकाणी स्विमिंगपुल असलेले फार्महाऊस आहेत. स्विमिंगपुलमध्ये डुंबण्याचा आनंद लोक घेतात. बैलगाडीची सफर सुद्धा करतात.

3) सुरक्षित आणि सोयीचे
फार्महाऊसमध्ये कुटुंबासमवेत सेलिब्रेशन करणे अनेकांना सुरक्षित वाटते. कारण कुठल्यातरी नवख्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये सुरक्षिततेची हमी नसते. त्यामानाने फार्म हाऊस मध्ये सुरक्षितता लाभते अनुचित प्रकार घडण्याची शक्यता कमी असते. तेथे राहणे प्रवास करणे सोयीचे ठरते.

4) मौजमजा व आराम
फार्महाऊसवर मौजमजा करताना थकवा आल्यास पाहिजे तेव्हा आराम करणे शक्य होते. आराम केल्यावर पुन्हा मौजमजा करता येते. फार्म हाऊस विविध उपक्रम खेळ घेता येतात. लहान मुले वृद्ध यांच्यासाठी तर फार्म हाऊस खूपच लाभदायक ठरते.

5) पैशांची बचत
स्वतःच्या फार्म हाऊस वर थांबल्याने किंवा तो भाड्याने घेतल्याने हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील आवाजवी खर्चाला आळा बसतो. फार्म हाऊस शहर किंवा गावापासून दूर असल्याने अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर देखील खर्च कमी होतो.

6)वेळेचे बंधन नाही
फार्महाऊसवर सेलिब्रेशन करण्यासाठी वेळेचे बंधन नसते. कोणीही केव्हाही सेलिब्रेशन करू शकतात. शहर गावापासून दूर असल्याने इतर कोणाला त्रास होण्याची शक्यता कमीच असते. मनसोक्त आनंद व मजा करता येते.

कोट्यवधींची उलाढाल
जिल्ह्यात हजारोंच्या घरात फार्महाऊस आहेत. काही वैयक्तिक वापरतात तर बहुतांश फार्महाऊस मालक भाड्याने देतात आणि अ‍ॅग्रो व इकोटूरिझमचा व्यवसाय सुद्धा करतात. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येथील बुकिंग फुल्ल झाली आहे. या 10 दिवसांत जिल्ह्यातील सर्वांचे भाडे, खाणेपिणे, ऍक्टिव्हिटी असे एकत्रित मिळून साधारण 10 ते 15 कोटींहुन अधिकची उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे फार्महाऊस विकसक अमित निंबाळकर यानी सांगितले.

स्वतःचे फार्म हाऊस नाही पण भाड्याने घेतलेल्या फार्म हाऊसवर नवीन वर्षाची सेलिब्रेशन करणार आहे. दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा फार्महाऊस अधिक चांगले वाटते. कुटुंबासोबत एकत्र येऊन खूप धमाल करतो.

रोशन म्हात्रे
पर्यटक
Exit mobile version