पर्यटकांची मिनी पर्यटनाला पसंती

वाढत्या महागाईचा परिणाम, कमी वेळात फिरण्याचा आनंद


| महाड | वार्ताहर |

वाढत्या महागाईचा परिणाम यंदाच्या पर्यटन हंगामावरही दिसू लागला आहे. कमी वेळात फिरण्याचा आनंद घेता यावा, खर्चही कमी व्हावा यासाठी पर्यटकांची पावले स्थानिक, छोट्या आणि कमी खर्चाच्या पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. दिवसेंदिवस महागाई उच्चांक गाठत असल्याने गृहखर्चाचे बजेट कोलमडले आहे. रोजच्या धकाधकीतून निवांत मिळावा, शाळांना सुट्या असल्याने फिरण्याचा आनंद मिळावा यासाठी अनेकजण सुटीत सहलीचे नियोजन करतात. नावाजलेल्या पर्यटनस्थळी गेल्यास निवास व खाण्यावर, वाहतुकीवर भरमसाट खर्च होतो. त्यामुळे आता पर्यटकांची पावले छोट्या आणि कमी खर्चाच्या पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. यामुळे सहकुटुंब सहलीचा आनंदही घेता येतो शिवाय खर्चही आवाक्यात राहतो. तीन-चार तासाच्या अंतरावरील पर्यटन स्थळे यासाठी पसंतीची ठिकाणे होऊ लागली आहेत. रस्त्यांची अवस्था, वारंवार होणारी वाहतूक कोंडी यातूनही पर्यटकांची सुटका होत आहे.

जिल्ह्यातील गडकिल्ले, लेण्यांवर तसेच धार्मिक स्थळी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. खासगी नोकऱ्यांमुळे सुट्यांचा कालावधी निश्चित नसल्याने आगाऊ आरक्षण करणे शक्य होत नाही त्यामुळे जवळच्या पर्यटन स्थळांना खास पसंती दिली जात आहे. मुंबई-पुण्याजवळ असल्याने ही पर्यटन स्थळे एक-दोन दिवसातच करता येणे शक्य होते. परिसरातील निवास व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असल्याने मिनी सहली पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या जिल्ह्यात थंडी पडू लागल्या असल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्‌‍‍यातील पर्यटनस्थळे
पर्यटकांनी जिल्ह्यातील दुर्लक्षित किल्ले, लेणी, समुद्रकिनारी मोर्चा वळवला आहे. महाड तालुक्यातील गांधारपाले व कोल येथील बौद्ध लेणी, सव व कोंडीवते येथील गरम पाण्याचे कुंड, दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ, पाचाड येथील राजमाता जिजाऊंची समाधी व राजवाडा, रायगड किल्ल्याबरोबरच महाडमधील सोनगड, चांभारगड, हनुमान टेकडी, वरंध घाट, वाळण कुंड, कडसरी लिंगाणा, माणगावमधील मानगड, मुगवली गणपती, पोलादपूरमधील तानाजी मालुसरे समाधीस्थळ असलेले उमरठ, कुडपण, श्रीवर्धनमधील दिवेआगर व हरिहरेश्वर, तळा तालुक्यातील तळागड व मांदाड लेणी, पालीतील सरसगड व सुधागड, फणसाडचे अभयारण्य, मिनी महाबळेश्वर असलेले दापोली, कासवांसाठी प्रसिद्ध असलेले वेळास, बाणकोट व मंडणगड येथील किल्ले, काशीदचा समुद्रकिनारा, बिर्ला मंदिर, वडघरचे साने गुरुजी स्मारक, गोरेगाव येथील मल्लिकार्जुन मंदिर टेकडी अशा छोट्या व कमी खर्चाच्या पर्यटन स्थळांना पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे.

दूरच्या पर्यटन स्थळांचा खर्च वाढू लागला आहे. त्यातच आगाऊ आरक्षण करावे लागत असल्याने सर्व प्रकारचे नियोजन करावे लागते. त्या तुलनेमध्ये आवाक्यात असणाऱ्या छोट्या सहली कुटुंबासोबत करण्यात खरी मजा येत आहे.

नितीन पालेकर, पर्यटक
Exit mobile version