वाढत्या तापमानात पर्यटकांची रायगडला पसंती

समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलू लागले

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात तापमान वाढत आहे. वाढते तापमान नकोसे झाले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दिली आहे. दररोज हजारोंनी पर्यटक रायगडमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे अलिबागसह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. अनेक पर्यटनस्थळांवर विशेष करून किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर पहिली ते नववी व अन्य व्यावसायिक शिक्षणाच्या परीक्षा सुरु झाल्या. या परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण झाल्या. परंतु, जिल्ह्यात तापमानात अचानक बदल झाला. उन्हाचे चटके जाणवू लागले. उष्माघाताचा धोका निर्माण झाला. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. परंतु, विद्यार्थ्यांना 2 मे रोजी होणाऱ्या निकालाकडे डोळे लागले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरु झाली. उन्हाळी सुट्टी कुठे घालवायची याचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटकांनी केले होते. परंतु, राज्यात तापमान वाढत असल्याने फिरायला कुठे जायचे, असा प्रश्न पर्यटाकांसमोर उभा होता. मुंबईत तर उष्णतेने कहर केली. दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणेदेखील नकोसे झाले. त्यामुळे उन्हाळी सुट्टी रायगड जिल्ह्यात घालविण्याचा निर्णय मुंबईसह पुणे व अन्य जिल्ह्यातील पर्यटकांनी घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून दररोज हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. काही जण दोन दिवस, तर काही जण आठ दिवस येऊन सुट्टीचा आनंद लुटत आहेत. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. किनाऱ्यावर असलेली पॅरास्लायडींग, बनाना अशा अनेक सागरी खेळाबरोबरच बोटींग, घोडागाडी, एटीव्ही बाईक, सायकलमधून सवारी करीत पर्यटक आनंद लुटत आहेत. उन्हाळी वातावरण असल्याने जास्तीत जास्त पर्यटक समुद्रात व स्विमींग पुलमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यामध्ये अधिक पसंती दर्शवित आहेत. उन्हाचे चटके लागत असल्याने पर्यटक जास्तीत जास्त वेळ समुद्रकिनाऱ्यांवर घालवत आहेत. समुद्रकिनारी असलेली हॉटेल्स, कॉटेजेस, रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. काही पर्यटक उन्हापासून बचाव करण्यासाठी हॉटेल, कॉटेजेसमध्ये बंद खोलीत एसी अथवा पंख्यामधून गारवा शोधत आहेत. त्यामुळे हॉटेल, कॉटेजेस फुल्ल असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.

पर्यटकांचा ताज्या मासळीवर ताव
रायगड जिल्ह्यामध्ये आल्यावर पर्यटक मासे खाण्यावर अधिक भर देत आहेत. पापलेट, सुरमई, बांगडा, कोलंबी, चिंबोरी, शिंपल्या अशा प्रकारचे ताजे मासे फ्राय करून खाण्याला पर्यटक पसंती दर्शवित असल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version