| माथेरान | प्रतिनिधी |
चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यटकांना घाटातून आपल्या लवाजम्यासह पायपीट करण्याची एकप्रकारे माथेरानला आल्याची शिक्षा सहन करावी लागली होती. गावातील सर्व हॉटेल्स आणि लॉज फुल्ल झाले होते तर काहींना रूम्स अभावी माघारी जाण्याची वेळ आली. ई-रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित वाहतुक सुविधेच्या प्रवासामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनाने वाहतूक कोंडी बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भविष्यात माथेरानला पर्यटकांची संख्या निश्चितच रोडावेल आणि याचा सर्वाधिक फटका इथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना सोसावा लागणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, नेतेमंडळीनी माथेरान मधील अल्प वोट बँकेचा विचार न करता या पर्यटन स्थळाला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वयोवृध्द मंडळी बोलत आहेत.
शनिवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही इथे हजेरी लावली होती पण याहीवेळी घाटात गर्दी पाहून मन अस्वस्थ झाले. इथले प्रशासन या गावासाठी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत की नाही. आम्हाला घाटातून पायपीट करण्याची सजा दिली जात आहे की काय असेच वाटते.
कृष्णकांत चटर्जी – पर्यटक मुंबई
माथेरान हे खूपच छोटेसे गाव आहे त्यामुळे इथे काही हजार पर्यटक आले की फुल्ल होऊन जाते आणि नेरळ माथेरान एकच मार्ग असल्याने खूपच गर्दी वाहतूक कोंडी होते गव्हर्नमेंटने महाबळेश्वर प्रमाणे दुसरा पर्यायी रस्ता केल्यास बरे होईल. महाबळेश्वरला जाण्यासाठी खूप रस्ते आहेत मग इथे का केले जात नाहीत.
रामकिशोर जांभवंत-पर्यटक मुंबई






