माथेरानच्या विकासाकडे दुर्लक्ष
| माथेरान । प्रतिनिधी ।
नागरिक आणि पर्यटकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून नेहमीच सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे लहान मुलांना घेऊन फिरायला येणार्या पर्यटकांना चढावाच्या घाटरस्त्यातून दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ही इथे येण्याची शिक्षा आहे की काय? असाही संतप्त सवाल पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे.
दस्तुरी येथे आजतागायत सुसज्ज पार्किंगची व्यवस्था नसल्याने दरवेळी नेरळ माथेरान ह्या घाटरस्त्यात तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत मोठया प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. यातून मार्ग काढणे खूपच कठीण बनते. त्यामुळे नाईलाजाने पर्यटकांना आपल्या लहान लहान मुलांना वयोवृद्ध आईवडिलांना घाटरस्त्यातुन दस्तुरी नाक्यापर्यंत पायी आणावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील हे एकमेव सुंदर पर्यटनस्थळ असून याकडे शासन आणि प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. साधी पार्किंगची सुसज्ज व्यवस्था होऊ शकत नाही त्यामुळे महागड्या गाड्या घाटात बेभरवसे पार्क करून पर्यटकांना यावे लागते. अशीच परिस्थिती कायम राहिली तर गावातील अंतर्गत विकासकामे तरी प्रशासन काय करणार आहेत. असाही प्रश्न ज्येेष्ठ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.अनेक वर्षांपासून कर्जत माथेरान दरम्यान धावणारी मिनीबस जर्जर झाली असून वेळेत सेवा उपलब्ध होत नाही. त्यासाठी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. त्यामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आमची गाडी घाटात लावून आम्ही जवळपास दोन किलोमीटर अंतर पहिल्यांदाच सर्वजण पायी चालत आलो. घाटात गाड्यांची खूपच गर्दी होते. चालण्याची सवय नाही त्यामुळे आमच्या वृद्ध आई वडिलांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
धर्मेश गुप्ता, पर्यटक मुंबई






