प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
| चौल | प्रतिनिधी |
नाताळपासून लागलेल्या सुट्टी, वर्षअखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून नव्हे, देशविदेशातूनही हजारोंच्या संख्येने पर्यटक अलिबाग तालुक्यातील नागाव, आक्षी, रेवदंडा, तसेच मुरुड समुद्रकिनारी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. परंतु, ऐन पर्यटन हंगामातच सुरू असलेल्या चौल परिसरातील रस्त्याच्या कामामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य पर्यटन मार्गांवरील अर्धवट काम, खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडी यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यटकांची वाढती संख्या पाहता त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पुढील चार दिवस रस्त्याची कामे बंद ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः सुट्टीच्या काळात पर्यटकांची संख्या वाढलेली असताना रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे दर्शन घडवत आहे. अनेक ठिकाणी काम सुरू आहे, मात्र ना योग्य सूचना फलक आहेत, ना वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही कामे बंद ठेवल्यास वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, असे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांचे मत आहे.
मुंबई, पुणे येथून मुरुडमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी सांगितले की, प्रवासासाठी लागणारा वेळ दुपटीने वाढत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. काही पर्यटकांनी तर पुन्हा या ठिकाणी न येण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे, त्यामुळे याचा थेट फटका स्थानिक पर्यटन व्यवसायावर बसण्याची शक्यता आहे.
चौलमळा येथील स्थानिक नागरिक शैलेश अनंत नाईक यांनीही प्रशासनावर टीका करत, ’31 डिसेंबरपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटकांच्या वाहनांची या मार्गावरुन वर्दळ असणार आहे, त्यामुळे पर्यटन हंगाम संपल्यानंतरच अशी कामे हाती घ्यायला हवी होती,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही एमएसआयडीसी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, 31 डिसेंबरपर्यंत या मार्गावरील काम तात्काळ बंद करण्यात यावी, जेणेकरुन कामामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, अशी विनंती वजा सूचना एमएसआयडीसीचे अभियंता बी.के. सिंग यांना करण्यात आली. यावर तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून काम बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.




