माथेरानमधील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

। नेरळ। प्रतिनिधी ।

माथेरान शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिश काळात बांधण्यात आलेले शार्लोट लेक पाण्याने भरले आहे. हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने माथेरानकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक शार्लोट लेक येथे गर्दी करू लागले आहेत. माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना ओलेचिंब होण्यासाठी आणखी एक हक्काचे ठिकाण निर्माण झाले असून सध्या या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.



ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला आणि त्यानंतर तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शार्लोट लेक तलाव खोदला. त्या तलावाची पाणी साठवण क्षमता ही 128 दशलक्ष लिटर पाण्याची आहे. तर तलावाच्या बाजूला बांधलेल्या बंधार्‍यामुळे तलावात 148 दशलक्ष लिटर पाणी साठवता येते. त्यामुळे हा तलाव माथेरान येथील नागरिकांचा पाणी पुरवठा करणारा तलाव समजला जातो. माथेरानमध्ये खोलगट भागात असलेल्या या तलावाच्या चोहोबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे सतत कोसळत असलेल्या पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना भिजण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. पन्नास फूट खोल असणारा गर्द झाडीत लपून बसलेला हा शार्लोट तलाव सध्या दुथडी भरून वाहत आहे. याच लेकच्या बाजूला पुरातन जागृत स्वयंभू ग्रामदैवत पिसारनाथ मंदिर आहे. पावसाळ्यात एक दिवसीय पर्यटनासाठी माथेरान सध्यातरी एकमेव पर्याय म्हणून जवळचे स्वस्त आणि मस्त पर्यटनस्थळ उपलब्ध आहे. त्याचवेळी सुरक्षित असलेले येथील धबधब्याचे ठिकाण पर्यटनासाठी नवीन डेस्टिनेशन बनले आहे.

Exit mobile version