पर्यटक अलिबागला अन विकासनिधी नागपूरला; पंडित पाटील यांची खोचक टीका

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पर्यटनाच्या निमित्ताने अलिबागसह संपूर्ण रायगडात पर्यटक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पण त्यांच्या अपेक्षित मुलभूत गरजांची पुर्तताच होत नसल्याबद्दल माजी आ. पंडित पाटील यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. पर्यटक अलिबागला आणि विकासनिधी फक्त नागपूरला अशी सरकारची अवस्था असल्याची टीकाही त्यांनी यानिमित्ताने केली.

थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबागसह संपूर्ण रायगडात हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत. अलिबाग ते वडखळ रस्त्यावर तर जागोजागी ट्रॅफिक जामच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी जर एखादा गंभीर रुग्ण मुंबईला अथवा अलिबागला आणायचा झाल्यास त्यांच्यावर कोणता प्रसंग उद्भवेल हे सांगणे कठीण असल्याचे पंडित पाटील यांनी स्पष्ट केले. यासाठी अलिबाग-वडखळ रस्त्याचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे.

गेली आठ वर्षे अलिबाग-विरार कॉरिडॉरबाबत आम्ही फक्त ऐकूनच आहोत. तो प्रत्यक्षात येणार कधी, अशी विचारणाही त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात आ. जयंत पाटील यांनी अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सरकारला प्रश्‍न विचारला होता. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जे उत्तर दिले ते चुकीचे आहे. वास्तविक सरकारी पैशांतून या रस्त्यांचे काम होणे गरजेचे आहे. जेएसडब्ल्यू कंपन्यांच्या सीआरएस फंडातून रस्ता करणेच चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कंपन्यांचा सीआरएस फंड हा मुलभूत विकासकामांसाठी वापरायचा असतो. त्या कंपन्या कोट्यवधी रुपयांचा कररुपाने जो निधी देतात त्यातून हा विकास होणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने विद्यमान शिंदे सरकारचे पर्यटक अलिबागेत आणि विकासनिधी नागपूरसाठी हे धोरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version