बंद पथदिव्यांमुळे पर्यटकांचा अंधारातून प्रवास

। माथेरान । वार्ताहर ।
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांना नगरपालिकेकडून सोयीसुविधा पुरविल्या जातात. पण पावसाळी पर्यटन हंगामात पथदिवे बंद असल्याने नागरिकांबरोबरच पर्यटकांचीही गैरसोय होत आहे. याबाबत तक्रार केली तरी संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सलग सुट्या आल्याने 12 ते 15 ऑगस्टदरम्यान 31 हजार 703 पर्यटक माथेरानमध्ये आले होते. मात्र विविध पॉईंटवरील बहुतांश पथदिवे बंद असल्याने त्यांची गैरसोय झाली. रस्त्यावर मध्येच एखादा दिवा सुरू तर आजूबाजूचे दिवे बंद अशी स्थिती अनेक पॉईंटवर पाहायला मिळाली.

नगरपालिकेने पॉईंटपर्यंत विद्युत व्यवस्था केली आहे, मात्र दुरुस्तीअभावी अनेक दिवे बंदावस्थेत आहेत. काही केबल भूमिगत टाकल्या होत्या; मात्र त्या वर आल्याने शॉक लागण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी एफआरपी बॉक्स खुले आहेत. दरम्यान, पथदिव्यांच्या खुल्या वीज वाहिनीमुळे घोड्याला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना यापूर्वी घडली आहे. असे असताना नगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रशासनही ठेकेदाराला जाब विचारत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

शार्लोट तलाव हा माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. याठिकाणी येणारे बहुतांश पर्यटक शार्लोट तलावाला भेट देतात. याठिकाणचे पथदिवे बंद असल्याने स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय होते. बाजूला घनदाट जंगल असल्याने श्‍वापदांचा संचार असतो. त्यामुळे पर्यटक घाबरतात. त्यांना सोडण्यासाठी अनेकदा मुख्य रस्त्यापर्यंत जावे लागते. त्यामुळे नगरपालिकेने प्राधान्याने पथदिवे सुरू करावेत.

– अविनाश गोरे, स्थानिक

रविवारी संध्याकाळी शार्लोट तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलो होतो. तेथील निसर्गसौंदर्य मनमोहक असल्याने बराच वेळ बसलो. याच परिसरात मंदिर असल्याने दर्शन घेऊन निघालो, मात्र तोपर्यंत सायंकाळचे साडेसात वाजले होते. बाजारपेठेतून हॉटेलवर जायला निघालो, तर पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे थोडी भीती वाटली. अखेर दुकानदाराने मुख्य रस्त्यावर सोडले.

– अमृत हंसराज, पर्यटक

माथेरानमधील मुख्य रस्ता, शहरासह अंतर्गत विभागात पथदिवे सुरू आहेत. पुढील काही दिवसांत वीजेचे खांब, एलईडी लावण्यात येणार असून तसे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. पुढील काही दिवसांत संपूर्ण शहरातील तसेच विविध पॉईंटवरील पथदिवे सुरू करण्यात येतील. याशिवाय जीर्ण वीज खांबही बदलण्यात येणार आहेत.

-सुरेखा भणगे-शिंदे, प्रशासक/मुख्याधिकारी

काही प्रेक्षणीय स्थळे आणि बंगल्यांच्या परिसरात पथदिवे नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीनवेळा नगरपालिकेत लेखी अर्ज केले आहेत. मात्र त्यानंतरही कार्यवाही झाली नाही. आता गोकुळाष्टमी, गणेशोत्सव जवळ आले आहेत. पावसाळी पर्यटन हंगामही चांगला सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर पथदिव्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

– प्रसाद सावंत, शहरप्रमुख, शिवसेना
Exit mobile version