पार्किंग अभावी पर्यटकांची वाहने माघारी

| मुरूड | वार्ताहर |

ऐतिहासिक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी राज्याच्या विभिन्न भागातून शनिवार पासून मोठया संख्येने पर्यटक काशीद आणि मुरूड बीचवर दाखल झाले असून, रविवारी जंजिर्‍याला तर पर्यटकांच्या मोठ्या उपस्थितीने छावणीचे स्वरूप आल्याचं दुपारी दिसून आले. खोरा बंदर जेट्टीवर वाहनांसाठी पार्किंग अपूरे पडत असल्याने अनेक पर्यटकांना आपापली वाहने घेऊन माघारी परतावे लागत असल्याचे दिसत होते. राजपुरी जेट्टीवर देखील पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत होती. खोरा जेट्टीवर नवीन प्रशस्त पार्किंग असूनही गेल्या 3 वर्षापासून बंद असून अद्याप सुरू झालेले नाही.

गुलाबी थंडी पडली असल्याने फॅमिली आणि युवा पर्यटक काशीद, नांदगाव, मुरूड आदी पर्यटन स्थानांवर मोठया संख्येने पर्यटक शुक्रवारी रात्रीपासून दाखल झाले आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर हे दोन्ही महिने पर्यटकांची वर्दळ कायम राहील अशी माहिती पर्यटन क्षेत्रातील अनुभवी मंडळींनी दिली. मुरूड परिसरातील पर्यटक वाढून पर्यटक स्थिर राहायचे असतील तर तालुक्यातील धार्मिक, ऐतिहासीक स्थळे विकसित करणे अत्यंत गरजेचं आहे, असे मत अनेक नागरिक आणि पर्यटकांनी व्यक्त केलं आहे. सालाव ते मुरूड हा 30 किमी चा मार्ग रुंद आणि सिमेंटचा करून वळणे कमी केली पाहिजेत. दर वर्षी पावसाळ्यात या मार्गाची खड्यांनी दैना उडते. उत्तम रस्ते, सुसज्ज आरोग्य सेवा, पर्यटन स्थळांची सत्य माहिती, इतिहास, त्या-त्या ठिकाणी लिखित स्वरूपात असणे गरजेचे आहे, असे मत विजय कदम, नारायण दुसाने, विश्‍वजित पाटोळे, शिल्पा कानेटकर आदी मुंबईतून आलेल्या अनेक पर्यटकांनी रविवारी दुपारी खोरा बंदर जेट्टीवर बोलताना व्यक्त केले.

मॉर्निंगवॉकला प्राधान्य
सध्या थंडीचा मोसम सुरू झाला असून येथील तापमान 25 सेल्सियस आहे. आगामी आठवड्यात तापमान आधिक खाली येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. सायंकाळी समुद्रकिनार्‍यावर थंड वारे वाहत असून शतपावली करण्यासाठी नागरिक आणि पर्यटक मोठया दिसून येतात. रविवारी मुरूड समुद्रात अनेक पर्यटक मनसोक्त पोहण्याचा आणि समुद्र सफरीचा आनंद घेताना दिसत होते.

लॉजिंग, हॉटेलिंग, टपर्‍या व्यवसायिकांना देखिल सुगीचे दिवस आल्याचे दिसून आले. पर्यटक स्थिरावले तरच पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होईल हे खरे असून त्यासाठी शासनाने आधिक सकारात्मक लक्ष घालणे गरजेचे आहे. प्रशस्त पार्किंग देखील महत्वाचे असून रुंद मजबूत रस्ते देखील महत्वाचे आहेत. इन्फोसिसच्या प्रमुख कोकण दौर्‍यावर असून कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मात्र कोकणातील माणसे खूपच प्रेमळ असल्याचे म्हटले आहे. या वरून कल्पना यावी.

Exit mobile version