वाहनतळाअभावीवाहने रस्त्यात उभी ; वाहतूक कोंडीची समस्या
| मुरूड जंजिरा | वार्ताहार |
वर्षपूर्ती आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ मुरूड, नांदगाव, काशीद बीचवर वाढती आहे. शुक्रवार, शनिवारी देखील मुरुडचा जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची वाहने राजपुरी जेट्टी आणि खोरा जेट्टीकडे जाताना दिसून आली.राजपूरी जेट्टीवर मात्र पार्किंग, टॉयलेट, पाणी आदी सुविधा असल्याने एकाच वेळी येथे सुमारे 80 ते 100 वाहने वाहनतळात उभी करण्याची सोय असल्याचे दिसून आले. परंतु खोरा जेट्टीवर वाहनांना थांबविण्यासाठी वाहनतळ नसल्यानेपर्यटकांची गैरसोय झाली होती. वाहने कोठेही उभी केल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.
शुक्रवार, शनिवारी सुमारे 5 हजार पर्यटकांनी जंजिऱ्याला भेट दिल्याचे राजपुरी येथे सांगण्यात आले. खोरा जेट्टीवर देखील पर्यटकांची वर्दळ सुरू होती . येथे वाहनतळाची कोणतीही सुविधा नसल्याने शनिवारी देखील या रस्त्यावर दूतर्फा वाहने लावली होती . वाहनतळाची सुविधा नसल्याने पर्यटक संतप्त झाले होते. खोरा जेट्टीवर लाखो रुपये खर्चून मेरिटाईम बोर्डाकडून नवीन प्रशस्त वाहनतळ तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. मेरिटाईम बोर्डाने ते अद्याप खुले केलेले नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे वाहने उभी करणे आणि वळवून बाहेर पडणे पर्यटकांना जिकरीचे होत आहे. .खोरा जेट्टीवर नवीन विस्तारित जेट्टीचे काम वर्षांपासून सुरू आहे.जून्या जेट्टीची लांबी कमी असल्याने ओहोटीचे वेळी प्रवासी जलप्रवासी वाहतूक बोट अथवा मासेमारी नौका धक्क्याला लागत नसल्याने आता जेटीची लांबी वाढविली जात आहे. ओहटी असेल तर जंजिराकडे जाणारी पर्यटकाची वाहतूक बंद करावी लागते, अशी माहिती खोरा जेट्टीवर देण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना खूपच मनस्ताप आणि खर्च सहन करावा लागतो.