नेरळ ग्रामपंचायत बरखास्तीचे दिशेने

राजीनामा देणार्‍या 15 सदस्यांच्या सह्यांची पडताळणी होणार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मुदतीआधी बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. या ग्रामपंचायतीमधील सरपंच वगळता अन्य सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे संख्याबळ राहणार नाही आणि 50 टक्के संख्याबळ नसल्याने कदाचित ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते. दरम्यान, 18 जुलै रोजी राजीनामे देणार्‍या सर्व 15 सदस्यांच्या राजीनामा पत्रावरील सह्यांची पडताळणी केली जाणार असून, या महिन्याच्या अखेरीस नेरळ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट की सरपंच उषा पारधी यांचे पदे कायम हे नक्की होणार आहे.

थेट सरपंच रावजी शिंगवा यांच्या अकाली मृत्यूनंतर जुलै 2021 मध्ये प्रभाग एकमधून निवडून गेलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील राखीव सरपंचपदावर विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना शिवसेना एक गट, भाजप, शेकाप या सदस्यांचे पाठबळ होते. प्रभाग एकमधून शेकापचे पॅनल मधून उषा कृष्णा पारधी या निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. सरपंचपदाची साधारण दोन वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नाहीतर सत्ताधारी पक्षाच्या नऊ सदस्यांनी सरपंच पारधी यांच्या कारभाराविरुद्ध दंड थोपटले होते.

ग्रामपंचायत अधिनियमनुसार 50 टक्क्यांपेक्षा कमी संख्याबळ असेल तर ते सदस्य मंडळ बरखास्त होते. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सध्या 16 सदस्य असून, त्यातील सत्ताधारी नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्याने आणि ते राजीनामे विशेष सभेत मंजूर झाल्यास नेरळ ग्रामपंचायत आपोआप बरखास्त होणार होती. मात्र, तरीदेखील विरोधी पक्षाचे सदस्यांनी राजीनामे दिले आहेत आणि त्यामुळे जनतेने कोणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारत आहेत. सरपंच उषा पारधी या आपल्या सहकारी सदस्यांचे ऐकत नाहीत हे बोलले जात आहे. त्यावेळी त्यांच्याकडून जनतादेखील सहकार्‍यांची अपेक्षा कशी करणार? अशावेळी विरोधी सदयस हे ग्रामस्थ यांच्यासाठी हक्काचे असतात. पण, सरपंच मनमानी करतात म्हणून सत्ताधारी सदस्य राजीनामा देतात आणि सत्ताधारी सदस्यांनी राजीनामे दिले म्हणून विरोधी पक्षाचे सदस्यदेखील राजीनामे देतात, हे पहिल्यांदा घडले आहे.

विशेष सभेत होणार निर्णय
ग्रामपंचायत मधील सत्ताधारी नऊ आणि विरोधी सहा अशा सर्व मिळून 15 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.त्या सर्व राजीनामे पत्रावरील सह्यांची पडताळणी करण्यासाठी विशेष सभा आठ दिवसात अपेक्षित आहे. विशेष सभेचा अजेंडा हा किमान चार दिवस आधी सदस्यांच्या घरी पोहोचला पाहिजे. विशेष सभेला राजीनामा देणार्‍या सदस्यांपैकी काही सदस्यांनी आपली सही चुकीची आहे, आपल्याला धमकावून सही घेतली आहे असे आक्षेप नोंदवल्यास त्या सदस्यांचे राजीनामे पत्र बाद होते. त्यामुळे 18 जुलै रोजी झालेले राजीनामा सत्र विशेष सभेनंतर खर्‍या निर्णयाकडे जाणार आहे. राजीनामे विशेष सभेत मंजूर झाल्यास नेरळ ग्रामपंचायत बरखास्त होणार आहे.
Exit mobile version