भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दिशेने

| मुंबई । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत दारुण पराभव केला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या मालिकेतील विजयासह ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आफ्रिकन संघाच्या या दारूण पराभवाचा भारतीय संघाला कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाने अलीकडेच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप केले. यासह भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. आफ्रिकेच्या पराभवामुळे भारतीय संघाची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. सध्या टीम इंडियाची विजयाची टक्केवारी आता 58.93 वर आली आहे. तर गुणतालिकेत कांगारू संघ 78.57 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. लंडनमधील ओव्हल येथे पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये अंतिम सामना खेळला जाईल.

या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या संघाची विजयी टक्केवारी 50 आहे. श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याची विजयाची टक्केवारी 53.33 इतकी आहे. आता भारतीय संघाला आपली पुढील मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळायची आहे. ही 4 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यासोबतच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार बनेल.

Exit mobile version