उल्हासनगरमध्ये पुन्हा टोइंग व्हॅन सेवा सुरू
| ठाणे | प्रतिनिधी |
उल्हासनगरच्या रस्त्यांवरील बेफाम पार्किंगवर आता आळा बसणार आहे. सात महिन्यांपासून बंद असलेली टोइंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू झाली असून, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वाहतुकीला अटकाव करणाऱ्या वाहनांवर दयामाया न करता यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. बिनधास्त पार्किंग संस्कृतीला चाप बसवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, नियम झुगारणाऱ्या वाहनचालकांना आता सरळ कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
उल्हासनगर शहरात वाहनधारकांकडून रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचं सत्र दिवसेंदिवस वाढत होतं. मात्र आता या बेशिस्त पार्किंगवर ब्रेक लावण्यासाठी वाहतूक विभाग पुन्हा सज्ज झाला आहे. तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेली टोइंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, उल्हासनगर कॅम्प चार आणि पाच परिसरात पहिली मोठी कारवाई करून रस्त्यांवर अडथळा ठरणारी वाहने उचलण्यात आली. टोइंग सेवेला मिळालेल्या नवसंजीवनीमुळे उल्हासनगरच्या रस्त्यांवरील अराजकाला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टोइंग व्हॅनवरील काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी गैरवर्तन, मनमानी कारवाई आणि व्यसनाधीनता यासारख्या तक्रारी आल्यामुळे ठाणे वाहतूक शाखेने ही सेवा तात्पुरती बंद केली होती. मात्र या कालावधीत शहरातील विविध भागांत रस्त्यावरच वाहने उभी राहून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पुन्हा सुरू झाली सेवाशहरातील वाहतूक सुरळीत राहावी, तसेच रस्त्यांचा अकार्यक्षम वापर थांबवण्यासाठी वाहतूक विभागाने पुन्हा टोइंग सेवा कार्यान्वित केली आहे. या सेवेला जनजागृती मोहिमेची जोड देत तीन दिवसांपासून उद्घोषणा केली जात आहे की, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करू नये अन्यथा कारवाई अटळ आहे.







