| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नगरपरिषदेच्या चार घंटागाड्या सेवेत दाखल आहेत. सद्यःस्थितीत बाजारपेठेतील मार्गावर कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या घंटागाड्यांवर व्यापारी दुकानातील जमा झालेला सगळा कचरा ठेवत असल्याने घंटागाड्यांवरील कर्मचाऱ्यांना ही एक डोकेदुखी ठरत आहे.
नगरपरिषदेच्या घंटागाड्या श्रीवर्धन येथील कानाकोपऱ्यात जाऊन कचरा गोळा करतात. बाजारपेठेत दुकानांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर सकाळ व रात्र अशा दोन फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, बाजारपेठ मार्गावरील अनेक व्यापारी या घंटागाड्यांचा गैरफायदा घेताना दिसतात. दुकानातील खराब धान्य, कुजलेल्या अवस्थेतील कांदे, बटाटे गोणीत, खोक्यात भरुन घंटागाडीकरिता ठेवतात.
अनेक वेळा व्यापाऱ्यांचा कचऱ्याने घंटागाड्या भरत असल्याने घरगुती कचरा कर्मचाऱ्यांकडून योग्य स्थितीत ठेवला जात नाही. परिणामी, घंटागाडीने वेग घेतल्यावर वरचेवर ठेवलेला कचरा वाऱ्याने उडाल्याने रस्त्यावर पडतो. नगरपरिषदेचा कचरा डेपो हा दोन किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या तसेच कचर्यात टाकलेले शिळे अन्नपदार्थ रस्त्यावर आढळून येतात.या बाबतीत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, श्रीवर्धन नगरपरिषद येथे संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.







