। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई-पुणे दृतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्गावरून नवी मुंबईत येणार्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जेएनपीटी मार्गावरील वाहतूकही बंद केल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे बंदी आदेश लागू असणार आहेत.
नवी मुंबई वाहतूक निंयत्रण विभागाकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उलवे येथे शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परसरातील वाहतुकीवरचा ताण वाढणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच या परिसरातील वाहतूक नियमन सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई परिसरातील सर्व रस्त्यांवर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (जुना महामार्ग) यावरून अवजड वाहने नवी मुंबईमार्गे मुंबई आणि ठाण्यात जात असतात. तर ठाणे मुंबईतून येणारी अवजड वाहने नवी मुंबई मार्गे पुणे, गोव्याच्या दिशेने जात असतात. ही बाब लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून नवी मुंबई परिसरात येणार्या आणि जाणार्या सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि प्रवाशांची वाहतूक करणार्या बसेस वगळता सर्व अवजड वाहनांना हे आदेश लागू असणार आहेत.
मोदींच्या सभेसाठी रिकाम्या एसटीच्या रांगा अरबी समुद्रातुन बांधण्यात आलेल्या अटल सेतूचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शुभारंभासाठी पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी गर्दी जमवण्यासाठी राज्यभरातून एसटी बसद्वारे कार्यकर्ते आणण्यात आल्याचे पाहायला मिळत असून, बहुतांश एसटी बसमध्ये कार्यकर्तेच नसल्याने बस जवळपास रिकाम्याच धावत आहेत.