गणेश विसर्जनासाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल; ‘या’ मार्गांवर प्रवेशबंदी

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

। पनवेल । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनावेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखेकडून पनवेल व आदई तलाव परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशी तसेच गौरी-गणपती विसर्जन आणि आगमनाच्या कालावधीत काही मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण लागू राहणार आहे. खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रेल्वे पूल चढून आदई तलावाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. मात्र गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. या मार्गावरील वाहनांनी खांदा कॉलनी, नवीन पनवेल सिग्नल, गार्डन हॉटेल सिग्नल आणि नवीन पनवेल पूलमार्गे इच्छित स्थळी जावे.

तसेच आदई सर्कलकडून आदई तलावाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी आदई सर्कलवरून सरळ शिवा कॉम्प्लेक्स आणि एचडीएफसी सर्कलमार्गे पुढे जावे लागेल.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत गौरी-गणपती विसर्जन व आगमनासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कर्नाळा भाजी मार्केट सर्कल तसेच कर्नाळा भाजी मार्केट सर्कल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गांवर प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच कर्नाळा सर्कल ते भाऊराव पाटील चौक या मार्गावरही वाहतुकीस बंदी राहणार आहे.

या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी पंचरत्न चौक मार्गाचा वापर करावा. उरण नाक्याकडून येणाऱ्या वाहनांनी पंचरत्न चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक किंवा विश्राळी नाका मार्गे पुढे जावे, असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

पोलीस वाहने, शासकीय वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.

– डॉ. राहुल खाडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक, नवी मुंबई

Exit mobile version