परळी बाजारपेठेला वाहतूक कोंडीचे ग्रहण

पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण

| पाली/बेणसे | वार्ताहर |

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या परळी गावात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या बाजारपेठेतूनच मुंबई, पुणे, कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. दरम्यान, अवजड वाहने परळी-खोपोली रस्त्याने सोडल्याने अजून मोठी वाहतूक समस्या होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असल्याने अन्य वाहनांना मार्ग काढणे कठीण जाते. परिणामी, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी वाहनचालकांची आणि ग्रामस्थाची आहे.

सध्या गणेशोत्सव होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक पाली-खोपोली राज्य महामार्गावरून वळवली आहे, याचादेखील मोठा परिणाम होऊन वाहतूक कोंडी होत आहे. सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून परळी गाव आणि येथील बाजारपेठेची ओळख आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला परळी गाव व बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या 40-45 गावांतील; तसेच आदिवासी वाड्यांतील लोक या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. सध्या अनेक लोक येथूनच अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीला जात आहेत. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असल्याने अन्य वाहनांना जाण्याचा मार्ग मिळत नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही परळी बाजारपेठेतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही.

काही महिन्यांपूर्वी तात्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या आदेशाने येथे अवैध पार्किंग करणारे व नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याशिवाय, काईंगडे यांनी लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेऊन समजही दिली; मात्र त्यानंतर पुन्हा वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच येथील रस्ताही अरुंद असल्याने वाहतूक कोंडी सोडवणे कठीण होत आहे. याबाबतीत वाहतूक विभाग काही निर्णय घेणार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Exit mobile version