माणगावात वाहतूक कोंडी कायम

महामार्गाचे रुंदीकरण जलद करण्याची मागणी

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव शहरात सलग तीन दिवस लागलेल्या सुट्ट्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच झाली होती. सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे मुंबई-पुणे येथील पर्यटक, नागरिक व त्यातच लगीनघाई यामुळे कोकणात उसळलेली गर्दी याचा चांगलाच फटका नागरिकांना बसला. त्यामुळे अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला.

दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्षीही मोठ्या प्रमाणात एप्रिल व मे महिन्यात लग्न असल्याने अनेकांची लगीनघाई तर कांहीची उन्हाळी सुट्टीसाठी लगबग त्यातच पर्यटकांची गर्दी यामुळे महामार्गावर तासनतास प्रवाशांची रखडपट्टी झाली होती. माणगाव हे दक्षिण रायगडचे प्रवेशद्वार असल्याने तसेच महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बाजारपेठेत मोठया प्रमाणात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ही वाहतुकीची कोंडी माणगावकरांसह सर्वांचीच डोकेदुखी ठरली असून तिसर्‍या दिवशीही नागरिकांना या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. कोकण व तळ कोकणात गेलेले नागरिक, पर्यटक तसेच समुद्र किनारी कोकण दर्शनासाठी गेलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले असून तिसर्‍या दिवशीही माणगावात वाहतूक कोंडीची साडेसाती कायम राहिली आहे.

माणगाव बाजारपेठेतील पुणे-निजामपूर-माणगाव रस्ता, मोर्बा मार्ग तसेच महामार्गावर प्रवासी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या. माणगाव बायपास रस्त्याचे काम थांबल्यामुळे वाहतूक कोंडीवर आणखीनच भर पडली आहे. मात्र या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा निकाली निघेल अशी पर्यटकातून चर्चा होत आहे. शासनांनी हा प्रश्‍न लवकर निकाली काढावा अशी मागणी होत आहे.

Exit mobile version