मालवाहतूक गाड्यांमुळे वाहतूक कोंडी

Oplus_16908288

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरातील वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून ट्रॅफिक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. परंतु, बाजारपेठ व टिळक रस्ता मार्गावरील किराणा दुकानदार वर्दळीच्या रस्त्यावर मालवाहतूक वाहन उभे करून वाहनातील किराणा सामान उतरवेपर्यंत एकाच ठिकाणी वाहन उभे करीत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पोलीस दंडात्मक कारवाई करणार का, असा प्रश्न त्रस्त पादचाऱ्यांकडून केला जात आहे.

श्रीवर्धन नगरपरिषद इमारतीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर मार्ग, दादरा पूल, जुने बसस्थानक व टिळक रस्ता या मार्गावर मोठी बाजारपेठ आहे. अरूंद रस्ते यामुळे या मार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील एक ट्रॅफिक पोलीस अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज चौकात तैनात केला जातो, तर सुट्टीच्या दिवसात पर्यटकांच्या गाड्या येत असल्याने बीट मार्शल ही तैनात करण्यात येतात.

कायम वर्दळीच्या मार्गावर बाजारपेठ, अरूंद रस्ते त्यातच बहुतांश व्यापारी किराणा सामान घेऊन येणारे सहाचाकी मालवाहतूक वाहन दुकानाच्या बाजूला उभे करून ठेवतात. यावेळी इतर सहाचाकी, चारचाकी वाहने आल्यावर पुरेसा रस्ता नसल्याने वाहनचालक आपले वाहन कसरत करत पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. नगरपरिषद व पोलीस ठाण्यातून व्यापारी वर्गाला मालवाहतूक वाहनांची वेळ ठरवून दिलेली आहे; परंतु व्यापारी वर्गाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुने बसस्थानक हा मार्ग अनधिकृत फेरी विक्रेत्यांनी व्यापला आहे. फास्ट फुड पदार्थ विक्रेते, फळ-भाजी विक्रेते, चप्पल विक्रेते, कापड विक्रेते हे रस्त्याच्या कडेला हातगाड्या उभ्या करीत असल्याने अनेकदा ग्राहक तिथेच दुचाकी, चारचाकी उभी करीत खरेदी करतात. या अनुषंगाने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. या अनधिकृत फेरी विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version