रहिवासी, पर्यटक व व्यावसायिक त्रस्त; मालवाहतूक ट्रकवाल्यांची दादागिरी
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाचे नियोजन व समन्वयाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीचे चित्र दररोज दिसून येत आहे. एसटी स्टँड ते दिवेआगर फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते. परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकसुद्धा त्यामुळे त्रस्त झाले आहेत.
श्रीवर्धनला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी बोर्लीलाच येतात. शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी याच मार्गाने जातात. वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांब असल्यामुळे अर्धा- अर्धा तास वाहतुकीची कोंडी सुटत नाही. बेजबाबदार नियोजनामुळे परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त असून, निदान चौक तरी त्यातून मोकळा करावा, अशी बोर्लीकरांची मागणी आहे. घरातून वाहने बाहेर काढणे तर दूरचीच गोष्ट, पण आपल्याच घरात आम्हाला जाणे मुश्कील झाले आहे.
बोर्लीपंचतन शहर हे दिवेआगर पर्यटन स्थळासाठी मुख्य बाजारपेठ असल्याने नेहमी अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने भरून जाते. मात्र, व्यापार्यांकडे येणार्या किराणा मालाचे ट्रक मुख्य रस्त्यात तासनतास मुख्य बाजारपेठ रस्त्यात उभे राहात असल्याने येथील लहान वाहनांसह पादचार्यांची वाट काढण्यात दमछाक होत आहे. मात्र, अद्याप बोर्ली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यात आली नाही. नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर वाहने उभी करणार्यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न कायम बोर्लीकरांना भेडसावत आहे.
प्रामुख्याने सकाळी 11 वाजताच्या सुमारास आणि सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येते. अर्धा-अर्धा तास ही कोंडी सुटत नाही. एकाच जागी बराच वेळ वाहने थांबून असल्यामुळे रस्त्यातून वाट कशी मिळणार हे अबालवृध्दांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विकेंडला तर पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यांना या ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. रस्त्यावरील बेकायदा ट्रान्सपोर्ट गाड्यांची पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते.
वाहतुकीचे नियोजन हवंय
बोर्लीपंचतन शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बोर्ली शहराला बायपास रस्ता काढावा याकरिता मागणी सुरु आहे. राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ची ओळख आता वाढू लागली आहे. बेकायदा पार्किंग , एसटी महामंडळ लांब पल्याच्या गाड्या, पर्यटकांची ये जा , दळन वळण साठी परिसरातील 38 गावांचा सबंध बोर्ली बाजार पेठेशी असतो. याशिवाय नागरी वस्ती हि मोठ्या प्रमाणात असते. यातून दिवसभराची वाहतूक कोंडीचा ताण वाहतुकीवर पडतो. दरम्यानच्या पादचर्याची गैरसोय होते. अंतर्गत रस्ता अरुंद असल्याने त्यावरून अवजड वाहने फिरत असल्याने दुचाकी आणि पादचार्यांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे वाहतूक नियोजन योग्य पद्धतीत व्हावे अशी मागणी जोर धरु लागलीय.