। पालघर । प्रतिनिधी ।
भौगोलिक दृष्ट्या तालुक्याचे मुख्यालय मोखाडा हे ठिकाण उंच टेकडीवर असून दोन्ही बाजूने तीव्र उतार आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायत काळातील लोकवस्ती आणि बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने आणि शासकीय कार्यालयाच्या आवारात लावलेली वाहने यांची वर्दळ कमी होती. परंतु, आता लोकसंख्या वाढीसोबतच प्रत्येक घरात दोनचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असून तालुक्याला कामानिमित्त येणारा नागरिक हा आपले वाहन घेऊनच मोखाड्यात येतो आणि रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा दिसेल तिथे पार्किंग करतो. यावेळी या रस्त्यांवरुन दोन चारचाकी वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहनचालकांना मात्र एकमेकांना बाजू देताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मोखाड्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे.
पुर्वीची ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीच्या मोखाडा शहराच्या बाजारपेठेच्या रचनेत फार काही विकासात्मक बदल झालेला नाही. तालुक्याची महत्त्वाची कार्यालये शहरातील प्रमुख बाजारपेठेत आहेत. यामुळे शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारा ग्रामीण भागातील नागरिक हा मोखाड्यात आल्यानंतर आपली वाहने रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा दिसेल तिथे पार्किंग करतात. यावेळी दुकानदार आणि वाहनचालक यांच्यात अनेकदा भांडणे झाली आहेत. मुळात मोखाडा शहरातील बाजारपेठेमधील रस्ता हा फार काही रुंद नाही आणि एक अर्धा मिटरचे फुटपाथ सोडले तर रस्त्याच्या कडेला इतर मोकळी जागा सुद्धा नाही. उलट काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे सामान फुटपाथवर लावलेले असते. यामुळे एकाच वेळी दोन चार चाकी वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहनचालकांना मात्र वाहन कोंडीला सामोरे जावे लागते.