| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने तसेच मुंबई-पुण्याकडून अलिबाग आणि गोव्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक प्रचंड मंदावली होती. मराठा आरक्षणासाठी आलेले बांधव आपापल्या गावी परतत असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. आठवड्याचा शेवट असल्याने दोन्ही महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. या कालावधीत वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेतले जात होते. मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, त्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात होती. या ब्लॉकद्वारे महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. मुंबई-गोवा महामार्गाचेही काही ठिकाणी काम सुरु आहे, तसेच विविध ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटत अलिबागमध्ये दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळती केली.