इंदापूर – माणगाव मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांब रांगा; बायपास कधी होणार? जनतेचा संतप्त सवाल

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा प्रवासी व वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी दि.(4) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून इंदापूर व माणगाव येथे वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी केवळ एक दिवसासाठी आहे असे नाही, तर रोजच प्रवासी, रुग्ण, वाहनचालक व पर्यटकांना वाहतूक कोंडीने रडकुंडीला आणले आहे. वाहतूक कोंडीने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तब्बल दोन ते तीन तास प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. सातत्याने बायपासची आस दाखवली जाते. मात्र, बायपास कधी होणार, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले काम आणि परिणामी या ठिकाणी झालेला अरुंद रस्ता तसेच नियमांचे उल्लंघन करून पुढे जाणारे वाहन चालक यामुळे वाहतूक कोंडी अधिक जटील झाली होती. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अनेकजण कोकणाकडे फिरण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला. इंदापूर व माणगाव येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास वाहनचालकांना व प्रवाशांना खोळंबावे लागले.

बेशिस्त वाहन चालक
अनेक वाहन चालक हे मार्गिका सोडून पुढे जात होते. तर काही वाहने हे दुसर्‍या मार्गिकेवर जात होते. त्यामुळे वाहनांच्या जवळपास दोन ते पाच लेन झाल्या. परिणामी, पुढून येणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच जटिल झाली. याबरोबरच वाटेत अनेक जणांची वाहने एकमेकांना धडकलीदेखील. यामुळे काही वाहनचालकांमध्ये भांडणदेखील झाले. तसेच काही वाहने बिघडलीदेखील.
अनेक वर्षांपासून रखडपट्टी
तब्बल 16 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किमी या पहिल्या टप्प्याचे सुरु झालेले काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद होतो. शिवाय, अनेक ठिकाणी डायव्हर्जनदेखील आहेत. परिणामी, महामार्गावर वाहने वाढल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. कोंडी लवकर सोडवण्यासाठी महामार्गाचे काम जलद पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
रुग्णवाहिकेलासुद्धा अडथळा
या वाहतूक कोंडीमध्ये अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. सर्व ठिकाणी वाहने थांबल्यामुळे रुग्णवाहिकेस कोणत्याही बाजूने जाण्यास मार्ग उरला नव्हता. खूप वेळ या रुग्णवाहिका सायरन वाजवत एकाच ठिकाणी उभ्या होत्या.
Exit mobile version