माणगाव शहरात वाहतूक कोंडीची समस्या

कोंडीमुळे हाणामारीचे प्रकार

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहराची शांतता, शिस्त व सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड वाहनांची रांग लागलेली दिसते. वाहतूक कोंडी इतकी तीव्र झाली आहे की काही ठिकाणी तर प्रवाशांत तोंडी वाद, धक्काबुक्की आणि हाणामारीचे प्रकारही घडताना दिसत आहेत. परिणामी नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणारे कामगार मोठ्या संकटात सापडले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाची अपूर्णता समस्येला ‘मुख्य कारण’ आहे. शहरातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्ण न झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक संपूर्ण शहरातच अडकून पडते. अरुंद रस्ता, उभ्या असलेल्या गाड्या आणि सततचा जड वाहनांचा ताण यामुळे छोटे-मोठे अपघात तर रोजचेच झाले आहेत. त्यातच वाहतूक वळवताना संपूर्ण शहर जाम होते. मोरबा रोड, कचेरी रोड, निजामपूर चौक हे शहरातील ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत.

मोरबा रोड, कचेरी रोड आणि निजामपूर चौक या भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण दररोज भीषण असते. रिक्षांची गर्दी, बसचा ताण, चारचाकी- दुचाकींची स्पर्धा आणि चौकातील अपुरे नागरिक नियोजन यामुळे नागरिकांना पंधरा मिनिटांचा प्रवासही अवघड होतो. पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी अत्यंत कमी असल्याने परिस्थिती हाताळताना त्यांच्यावर प्रचंड ताण येत आहे. एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन चौकांवर लक्ष ठेवावे लागत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे अशक्यप्राय होते. या कारणामुळे अपघात झाल्यावर किंवा वाद झाल्यास तात्काळ नियंत्रण करणेही कठीण जाते. अचानक हाणामारीचे प्रकार नागरिक भयभीत झाले आहेत. गर्दीत अडकलेली वाहने, पुढे जाण्याची घाई, समोरच्याचे ऐकू न घेणे या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही ठिकाणी धक्काबुक्की, तोंडी वाद आणि हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. या घटनांमुळे महिला व ज्येष्ठ नागरिक अधिकच घाबरले असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक नागरिकांचा आग्रह आहे. शहरातील नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या जोरदारपणे मांडल्या आहेत. वाहतूक पोलिसांचा तातडीने बंदोबस्त वाढवावा. महामार्गाचे अपूर्ण काम जलदगतीने पूर्ण करावे. चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था व सीसीटीव्ही बसवावे.

अतिक्रमण हटवा
मोरबा रोड, कचेरी रोड व निजामपूर चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे. माणगाव शहराचा दैनंदिन श्वास गुदमरत चालला आहे. वाहतूक कोंडीचे सर्पिल जाळे वाढत चालले असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Exit mobile version