| माथेरान | प्रतिनिधी |
प्रत्येक सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत असल्याने माथेरान पर्यटन स्थळाला भेट द्यावी की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पर्यटक बोलत आहेत. मुळातच दस्तुरी नाक्यावर असलेली अपुरी पार्किंग व्यवस्था याला कारणीभूत असून, या भागातील एमपी 93 हा प्लॉट जोपर्यंत पार्किंगसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत पर्यटकांना असाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता असून हा तिढा सुटणे अशक्यच असल्याचे बोलले जात आहे.
जेमतेम दहा हजार पर्यटकांची क्षमता असलेल्या या ठिकाणी मुंबई कडील पर्यटक जवळचे पर्यटनस्थळ असल्यामुळे सुट्ट्यांच्या हंगामात मोठया प्रमाणावर गर्दी करत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढल्यास दस्तुरी नाक्यावर पार्किंग साठी सद्यस्थितीत जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मागील काळात यासाठी वनसमितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, त्यांनी केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. वाहतूक कोंडीचा तिढा कायमस्वरूपी संपुष्टात येण्यासाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मानसिकता असल्यास सहज शक्य आहे. परंतु, या स्थळाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एक दृष्टीने गर्दीच्या काळात माथेरानला भेट देण्याची शिक्षा असल्याचेही पर्यटकांमधून चर्चा होत आहेत.
जून महिन्यात आम्ही याठिकाणी आलो होतो त्यावेळी सुध्दा घाटात प्रचंड प्रमाणात गर्दी होती. यावेळी वाटले की प्रशासनाने काहीतरी व्यवस्था करून हा प्रश्न मार्गी लावला असेल परंतु येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती याहीवेळी आम्हाला अनुभवायला मिळाली ही खरोखरच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
– शंतनू कर्णिक,
पर्यटक मुंबई







