मोहोपाडा कामगार नाक्यावर वाहतूक कोंडी

| रसायनी | प्रतिनिधी |

दांड-रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा जनता विद्यालय वळणावर सकाळी कामगार मोठ्या प्रमाणावर रस्त्यामध्ये उभे राहत असल्याने रोजची वाहतूक कोंडी होत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. शिवाय सकाळी कंपनीमध्ये जाणाऱ्या बसेस सकाळी येत असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होऊन बसली आहे. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ने-आण करणाऱ्या बसेस, रिक्षा याच वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहतात. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळेवर न पोहचता रोज 20 ते 30 मिनिटे उशीर होत आहे. तसेच सकाळी मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या महिलांना सुध्दा या गर्दीचा खुप त्रास सहन करावा लागत आहे. यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिक्षावाले बेकायदेशीर रिक्षा उभ्या करतात. रस्त्यावर कामगार उभे राहत असल्याने अपघात होत आहेत.जनता विद्यालय वळणावरील सकाळी कामगार उभे राहण्याचे ठिकाण बदलून पर्यायी जागा मोहोपाडा येथील अचानकचे मैदान किंवा से. बी. रोड येथे करावी, अशी मागणी टाकेदेवी विद्यार्थी सेवाभावी संस्था रसायनी (नोंदणीकृत) यांनी रसायनी पोलिस, वासांबे ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version