पुढाऱ्यांविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; रखडलेल्या बायपासमुळे संताप उसळला
| माणगाव प्रतिनिधी |
कोकणातील शिमगा म्हणजे उत्साह, जल्लोष आणि गावाकडे परतण्याचा आनंदसोहळा. मात्र, यंदा माणगाव आणि इंदापूर परिसरात सणाचा रंग वाहतूक कोंडीनेच फिका केला. तासन्तास वाहनांच्या रांगा, कडक उन्हात अडकलेली लहान मुले, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप उसळला. ऐन शिमग्याच्या काळातच नागरिकांनी पुढाऱ्यांच्या नावानेच ‘शिमगा’ करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.
माणगाव व इंदापूर येथील रखडलेल्या बायपासमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. होळीच्या सलग सुट्ट्यांमुळे हजारो वाहनांची वर्दळ वाढली. मात्र अपूर्ण रस्ते, अरुंद मार्ग, खड्डे आणि सुरू असलेली कामे यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, अनेकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागले. काही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने किरकोळ अपघात घडले आणि कोंडी आणखी वाढली. रुग्णवाहिकादेखील या कोंडीत अडकल्या. उन्हात हैराण झालेली लहान मुले रडताना दिसत होती, तर ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. “सण साजरा करायला निघालो आणि रस्त्यातच अडकलो,” अशी हळहळ अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
कोंडी सोडवण्यासाठी माणगाव पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला, वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले तसेच पर्यायी मार्गांचा सल्ला देण्यात आला. मात्र, वाढती वाहनसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र होते. कडक उन्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही ताण सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेकदा मुदती जाहीर झाल्या. केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच बांधकाम मंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली; मात्र तब्बल 17 वर्षांनंतरही बायपास पूर्णत्वास न गेल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. रखडलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांची मालिकाही सुरूच असल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिमग्याच्या पारंपरिक ज्वाळांमध्ये यंदा संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या अपूर्ण आश्वासनांचे प्रतिकात्मक दहन केल्याची चर्चा रंगली. विविध पक्षांचे पदाधिकारी मुखवटे घालून आश्वासने देतात, अशी उपरोधिक टीका करत ‘खोट्या आश्वासनांचा शिमगा’ करण्यात आला. सणाच्या उत्सवातही राजकीय निष्क्रियतेविरोधात संतापाची ठिणगी पेटल्याचे चित्र दिसले. कोकण होळीच्या रंगात न्हाऊन निघत असताना यंदा मात्र संतापाचा लाल रंग अधिक गडद झाल्याचे जाणवत आहे. प्रवाशांची ही बोंबाबोंब केवळ क्षणिक नाराजी नसून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिलेली ठाम चेतावणी आहे. आता आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीचीच गरज असल्याची एकमुखी मागणी होत आहे.







