स्कूलबसमुळे वाहतूक कोंडी

वाहतूक विभागाकडे तक्रार दाखल

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदा वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शाळांसमोरील रस्त्यांवर दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीबाबत ‌‘परिवर्तन सामाजिक संस्था’चे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी नवी मुंबई वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

वाघमारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, खांदा वसाहतीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या परिसरातून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी अनेक वाहनचालकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. या परिसरात महात्मा स्कूल, होरायझन, सेंट जोसेफ, रायन इंटरनॅशनल, डीएव्ही पब्लिक स्कूल, डॉ. पिल्लई ग्लोबल अकादमी आणि फडके हायस्कूल अशा अनेक शाळा आहेत. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी या सर्व शाळांच्या व्हॅन्स आणि बसेस एकत्र आल्याने शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. मागे त्याकरिता वाहतूक अधिकारी आणि खांदा वसाहतीमधील संस्था शाळा बैठक होऊनसुद्धा आहे तीच परिस्थिती आहे. एखाद्या वेळी आग लागली तर अग्निशमन दलाच्या गाड्या येतील कधी? शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळेस शाळांसमोरील रस्ते पूर्णपणे ब्लॉक होत असून, या वाहनांमुळे नागरिक आणि इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळांच्या मैदानातच बस-व्हॅन उभ्या ठेवून विद्यार्थ्यांना सोडणे व घेणे याची सोय करावी, अशी मागणीही संस्थेने केली आहे. वाघमारे यांनी यासंदर्भात वाहतूक विभागाने योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version