| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर वसाहतीमधून बेलपाडा भारती विद्यापीठ आणि उत्सव चौकाकडे आणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. रस्त्यालगत थाटलेली ही गॅरेज फक्त वाहतुकीला अडथळा ठरत नसून, पदपथही व्यापून टाकत आहेत. परिणामी, या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक विभागाने तातडीने हस्तक्षेप करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उत्सव चौकातून भारती विद्यापीठाकडे आणि भारती विद्यापीठातून उत्सव चौकाकडे जाणारा रस्ता हा खारघरमधील महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र, बेलपाडा गावाशेजारील मेट्रो मार्गालगत काही गॅरेज व्यावसायिकांनी खुले आम रस्त्यावर गॅरेज थाटली आहेत. वाहनांची दुरुस्ती, टायर बदलणे, तेल बदलणे यांसारखी कामे रस्त्यावरच सुरू असतात. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जातो. पादचारी आणि वाहनचालकांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी सांगितले, की या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. सकाळ-संध्याकाळ ऑफिसला जाणाऱ्यांना पोहोचणे अवघड होते. कारवाईवर प्रश्नचिन्ह काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कारवाई केली जाते, तेव्हा गॅरेज व्यावसायिक स्वतः बाजूला होतात आणि त्यांच्याऐवजी कामगारांना समोर उभे केले जाते. नंतर किरकोळ दंड भरून प्रकरण मिटवले जाते. त्यामुळे अशा कारवायांचा फारसा परिणाम होत नाही. गॅरेज पुन्हा त्याच ठिकाणी सुरू होते. यामुळे वाहतूक पोलिसांवर डोळेझाक केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तरी ही खारघर परिसरात अशी गॅरेज खुलेआम सुरू आहेत, ही बाब प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करून रस्ते मोकळे करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.







