आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत दर बुधवारी भरवला जाणारा बेकायदा आठवडा बाजार सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. प्रत्येक आठवड्याला हेच चित्र दिसत असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण होते.

बाजाराच्या दिवशी मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळ व्यापाऱ्यांनी व्यापलेले असतात. फळे, भाजीपाला, कपडे व इतर वस्तू विक्रीसाठी विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसत असल्याने वाहनांसाठी मार्ग अत्यंत अरुंद होतो. परिणामी वाहतूक संथ गतीने चालते, तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्पही होते. या कोंडीमुळे नागरिक आणि आपत्कालीन सेवांनाही मोठा फटका बसतो. विशेषतः रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही. वाहनचालकांच्या मते, बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दर बुधवारी आम्हाला प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. काही वेळा 10-15 मिनिटांचा प्रवास तासभरात पूर्ण होतो, अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून बेकायदा बाजार हटवावा किंवा नियोजित ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version