महामार्ग पोलीसांकडून नियोजनला सुरुवात
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकणात येणारे चाकरमानी व गणेशभक्तांचा प्रवास यंदा वाहतूककोंडी मुक्त होण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. यावेळी गणेशोत्सवासाठी जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील यांनी दिली आहे.
मुंबईकर चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून त्यांचे गावाकडे येण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यासाठी साहित्य खरेदी, गाड्यांचे आरक्षण याची जूळणी सुरू झालेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसातच महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुकीला सुरूवात होईल. गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येत असली तरीही महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात. या गोष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग पोलीसांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेर्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळून या काळात इतर सर्व 16 टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चाकरमान्यांचा प्रवास हा निर्विघ्न व्हावा, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये 27 पोलीस अधिकारी व कर्मचारी, वॉकीटॉकी, टोकन क्रेन, रुग्णवाहिका, सीसीटीव्ही तैनात असतील. महामार्गावर मोटारसायकल पेट्रोलिंगही सुरू राहील. गणेश भक्तांसाठी जागोजागी सुविधा केंद्रे, चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, फोटो गॅलरी, पोलिस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहनतळ, वाहन दुरुस्ती कक्ष तयार केले जाणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव काळात 5 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 13 सप्टेंबर 11 वाजेपर्यंत, तसेच 17 सप्टेंबरला रात्री 8 वाजल्यापसून ते 18 सप्टेंबर रोजी रात्री 4 वाजेपर्यंत 16 टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी आहे.