निजामपुरात वाहतूक कोंडीची डोकेदुखी

पर्यटकांच्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त
| माणगाव | प्रतिनिधी |
दिघी-माणगाव-पुणे या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील निजामपूर शहरातून हा मार्ग गेल्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याकडेला असणार्‍या बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. किंबहुना, निजामपूर बाजारपेठेत सध्या छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, या वाहतूक कोंडीची निजामपूर ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे.

विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्या सुरु झाल्या आहेत. या एमआयडीसीकडे जाणारा येणारा रस्ता हा निजामपूर बाजारपेठेतून जातो. त्यातच पुणे, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातून शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात वाहनांनी कोकणात निजामपूर मार्गे येतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता निजामपूर बायपास झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम निकाली निघेल, अशी नागरिकांना आशा वाटत आहे.

सततच्या होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे निजामपूर शहरातून जाणार्‍या वाहतुकीवर प्रश्‍नचिन्ह उभारले जात आहे. वाढत्या अपघातामुळे निजामपूर शहराबाहेरून काढण्यात येणार्‍या बायपासला गती कधी मिळणार, असा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याकडे शासनांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांतून उमटत आहे. निजामपूर विभागातील प्रमुख बाजारपेठ असणार्‍या निजामपूर शहरात अवैद्य वाहन पार्किंगमुळे गेल्या काही दिवसांत वाहनांचे अपघात होत आहेत.

बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका अपघातामध्ये एका तरुणाला जीव गमावावा लागला. त्यामुळे अवैध पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ही समस्या येथील नागरिकांना सतत भेडसावत आहे. या ठिकाणी सतत नागरिकांची वर्दळ असते. तसेच वाहनांची मोठी गर्दी होते. या मार्गावर दोन मोठी वाहने आल्यास अरुंद रस्त्यामुळे वाहने रस्त्याच्या साईडपट्टीने चालतात. त्यातच रस्त्याकडेला उभे असणारी अवैध पार्किंग यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी सतत होत आहे.

शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास खात्याकडून निजामपूर शहराबाहेरून बायपास प्रस्तावित केला होता. त्याची पाहणी ही संबंधित अधिकार्‍यांकडून करण्यात आली होती. तो बायपास रस्ता आजही प्रलंबित आहे. तो रस्ता कधी मंजूर होणार असा प्रांजळ सवाल उपस्थित होत आहे. तसेच निजामपूर बाजारपेठेतील बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी ठेवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version